राज्याच्या काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली असून मराठवाडा विभागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. राज्यात आजपर्यंत ५३०मिमी. पाऊस झाला असून तो सरासरीच्या ५६.६ टक्के आहे. त्यामुळे काही धरणांमध्ये अजूनही पाणी नसून जलाशयातील सर्व प्रकल्पांत जेमतेम ४९ टक्के पाणी साठा असल्याची माहिती मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.  राज्यात आजवर केवळ नागपूर जिल्ह्य़ात १०० टक्क्य़ांहून अधिक पाऊस झाला असून अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा या चार जिल्ह्य़ातही चांगला म्हणजे १०० टक्के पर्यंत पाऊस झाला आहे.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, िहगोली, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्य़ात ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली.
यवतमाळ, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी जिल्ह्य़ात मात्र ५० टक्के पेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांत केवळ ४९टक्के साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास हा साठा ६६ टक्के होता.  मराठवाडय़ात ८ टक्के पाणीसाठा आहे.