जीवाने १०२ क्रमंवार दूरध्वनी करताच दोन तासांत धारणीतल्या त्या गावात रुग्णवाहिका आली. जीवाच्या पत्नीची फुलाबाईची प्रसूतीची वेळ जवळ आली होती. रुग्णवाहिकेमधून सरकारी महिला रुग्णालयात पोहोचल्यानंतर दोनच दिवसांत तिने गोजीरवाण्या बाळाला जन्म दिला. बाळंतपणासाठी एक रुपयाचाही खर्च जीवाला आला नाही. गेल्या दोन वर्षांत आरोग्य यंत्रणेने सुरक्षित मातृत्वासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे शासकीय रुग्णालयात बाळंतपणासाठी जाणाऱ्या महिलांची संख्या प्रचंड वाढली असून राज्यात एकूण होणाऱ्या प्रसूतीपैकी निम्म्या प्रसूती आता शासकीय रुग्णालयांत होत आहेत.
आदिवासी तसेच ग्रामीण भागांत काही वर्षांपूर्वी शासकीय रुग्णालयांमध्ये बाळंतपणासाठी जाण्यास गोरगरीब तयार नसत कारण रुग्णालयात एकतर औषधे उपलब्ध नसत तसेच शस्त्रक्रियेसह वैद्यकीय उपचारांत होणारी आबाळही धडकी भरवत असे. आरोग्य विभागाने गेल्या दोन वर्षांत सुरक्षित मातृत्वासाठी योजना आखल्या व प्रत्यक्षात अमलात आणल्या. त्यानुसार १०२ व १०८ क्रमांवर दूरध्वनी करताच रुग्णवाहिका मोफत उपलब्ध होईल, एवढेच नव्हे तर सर्व औषधे रुग्णालयांत उपलब्ध असतील आणि रुग्णांना बाहेरुन औषधे आणावी लागणार नाहीत, अशी व्यवस्था केली. गर्भवती महिलेला सकस जेवण तसेच आवश्यक त्या चाचण्याही उपलब्ध करून दिल्यामुळे शासकीय रुग्णालयांत प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली.
आकडेवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास २००७-०८मध्ये प्रसूतीचे जे प्रमाण ३३ टक्के होते तेच २०१४मध्ये ५५ टक्के झाल्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले. अमरावती, धारणी, परभणी, जालना आणि गोंदियामधील महिला रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांपेक्षा कितीतरी जास्त रुग्ण दाखल होत असतात, असेही डॉ. पवार म्हणाले. दोन वर्षांपूर्वी शासकीय रुग्णालयांत ४,६२,८२० महिलांची प्रसूती झाली तर २०१३-१४मध्ये हीच संख्या वाढून ७,६८,३८० एवढी झाली. यातील निम्म्याहून अधिक महिलांना घरातून शासकीय रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आले होते.
आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांना विचारले असता, नव्वद टक्क्य़ांहून अधिक महिलांना मोफत सकस आहार दिला जातो, असे त्यांनी सांगितले. प्रसूतीसाठी पूर्वी रुग्णालयात येणाऱ्या महिलेला तीन-चार हजार रुपयांची औषधे बाहेरून आणावी लागत होती. परिणामी हा वर्ग खासगी रुग्णालयातच दाखल होत असे. आता प्रसूतीसाठी आवश्यक ती सर्व औषधे आम्ही देत असल्यामुळे रुग्णांवर कोणत्याही खर्चाचा भार पडत नाही, असे ते म्हणाले.
जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून सुरक्षित प्रसूतीला सर्वोच्च स्थान देण्यात आले असून १०२ क्रमांकाच्या २२३४ रुग्णवाहिका तर १०८ क्रमांकाच्या ९३७ रुग्णवाहिका रुग्णांना थेट घरातून अथवा अपघात स्थळांहून आणण्यासाठी सज्ज आहेत. गेल्या वर्षभरात सुमारे साडेतीन लाख महिलांना प्रसूतीसाठी या रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयात आणण्यात आल्याचेही आरोग्यमंत्री शेट्टी यांनी सांगितले. प्रामुख्याने आदिवासी भागांत सुरक्षित मातृत्वासाठी विशेष काळजी घेतली जाते, असेही ते म्हणाले.