दीड दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यासाठी समुद्रात उतरलेल्या भाविकांना अचानक माशांनी चावा घेण्यास सुरुवात केल्याने मंगळवारी गिरगाव चौपाटीवर घबराट उडाली. हा दंश अत्यंत वेदनादायी असल्याने रात्रीपर्यंत सुमारे ५४ जखमी भाविकांना जे.जे., जी. टी. व नायर रुग्णालयात दाखल व्हावे लागले.
भाविकांना ‘स्टिंग रे’ मासे चावल्याचे प्रथम सांगितले जात होते मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळत नव्हता. त्यांना माशांनी चावा घेतला की पाण्यातील सापांनी, याबाबतही शोध सुरू होता. अर्थात असा प्रकार मुंबईत नजीकच्या काळात प्रथमच घडल्याने भाविकांमध्ये घबराट आहे.
भाविकांना चावलेला मासा सुदैवाने विषारी नाही. पण त्याचा चावा खूप वेदनादायी असतो. लोकांवर उपचार केल्यानंतर, त्यांच्या वेदना कमी झाल्यानंतर रुग्णालयातून सोडून देण्यात येईल, असे नायर रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. शहा यांनी सांगितले.
पाचव्या व दहाव्या  दिवशी काळजी घेणार
विसर्जनावेळी भाविकांना झालेल्या या दंशाच्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण करून याबाबत सल्लामसलत केली जाईल आणि पाचव्या आणि दहाव्या दिवशी विसर्जनावेळी असा प्रकार होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. महानगरपालिकेलाही योग्य ती व्यवस्था करण्यास सांगण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.