शीव-पनवेल रस्त्यावर मंगळवारी रात्री वेगवान वाहनांच्या चाकांखाली एका महिलेसोबत माणुसकीही चिरडली गेली.
रस्त्यावर निपचित पडलेल्या या महिलेच्या अंगावरून तब्बल पन्नास वाहने वेगाने निघून गेली. आपल्या गाडीला मागून येणारी वाहने धडकतील या भीतीमुळे कुणीही रस्त्यावर थांबत नव्हते.. मात्र आपल्या वाहनाखाली काय आहे, हे पाहण्यासही कुणाला सवड नव्हती. काही वेळाने रस्त्यावरून जाणाऱ्यांनी हे भयावह दृश्य पाहिले आणि त्यानंतर वाहनांना थांबविण्यात आले. मात्र तोपर्यंत मृत्यू झालेल्या या महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता.
माणुसकीला काळिमा फासणारा हा अपघात खारघर उड्डाणपुलावर घडला. केवळ वाहनचालकांची ‘वेगधुंदी’ आणि ‘वेळकंजुषी’ याचीच ही महिला बळी ठरली. तिच्या मृतदेहाजवळ एक चादर सापडली असून, त्यात काही सुटे पैसे होते. त्यावरून ती भिकारी असावी, असा पोलिसांना संशय आहे.मात्र हा अपघात झाल्याचे सुरुवातीलाच समजले असते आणि तिच्यावर वेळीच उपचार झाले असते, तर ती वाचू शकली असती. मात्र सुमारे ५० वाहने तिच्या अंगावरून जाईपर्यंत तिच्याकडे कुणाचे लक्ष नव्हते.
आपल्या चाकांखाली एखादे जनावर आले असावे, असे समजून चालक तसेच वाहन पुढे हाकत होते. मृतदेहाचा पंचनामा करताना लांब केसावरून हा महिलेचा मृतदेह असल्याची खात्री पोलिसांना पटली.

वेगधुंद मस्तवाल
शीव पनवेल महामार्गाचे कॉंक्रीटीकरण झाल्यावर ३० किलोमीटरचे अंतर अवघ्या तीस मिनीटात कापता येते. मिनीटाला एक किलोमीटर अंतर कापण्याच्या स्पर्धेमुळे वेगधुंद मस्तवालांची संख्या वाढलेली आहे. चालकांचे वेगावर नियंत्रण राहिलेले नसल्याचे गेल्या काही दिवसांत झालेल्या भयान अपघातांमुळे दिसून येते.