पोलीस संरक्षण घेतलेल्या व्यक्तीकडून तब्बल ५१ लाख रुपये थकबाकी असल्याची माहिती उघडकीस आली असून एकूण ४६ व्यक्तींमध्ये चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला आणि फौजदारी वकील माजिद मेमन, शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले तसेच काही बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी यासंदर्भात माहिती मागितली होती.
साजिद नाडियादवाला यांच्याकडून १.२२ लाख रुपये, माजिद मेमन यांच्याकडून १.३१ लाख रुपये, मोहन रावले यांच्याकडून १.६६ लाख रुपये, व्यापारी संघटनेचे सदस्य वीरेन शहा यांच्याकडून ८८ हजार रुपये इतके थकबाकी येणे बाकी असल्याचे या माहितीद्वारे समोर आले आहे.
एकूण ४६ थकबाकीदार असून त्यापैकी १८ जणांनी मार्च २०१२ मध्ये पोलीस संरक्षण घेणे थांबवले असले तरी त्यांच्याकडून अद्याप २६.२७ लाख रुपये थकबाकी येणे आहे.
पोलीस संरक्षण घेऊन त्यापोटी भरावी लागणारी रक्कम मात्र न भरलेल्या सर्व थकबाकीदारांचे उत्पन्न लाखोंच्या घरात असून त्यांना खाजगी सुरक्षाही परवडू शकते. त्याचबरोबर मेमन, नाडियादवाला आणि अन्य बांधकाम व्यावसायिक थकबाकीदार बनल्यावर त्यांचे पोलीस संरक्षण का काढून घेण्यात येण्यात आले नाही, ही आश्चर्याची बाब आहे, असे चेतन कोठारी यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांकडे सर्व थकबाकीदारांची मिळून ५१ लाख रुपयांची रक्कम येणे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
एखाद्या व्यक्तीला येणाऱ्या धमक्या, त्याची गंभीरता याची चाचपणी करून एक किंवा अधिक कॉन्स्टेबल्सची सुरक्षा त्या व्यक्तीला देण्यात येते, असे पोलिसांनी सांगितले. थकबाकी राहिल्यानंतर संबंधित व्यक्तीची सुरक्षा व्यवस्था कमी का केली जात नाही या प्रश्नावर वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, थकबाकीची नोटीस संबंधितांना देण्यात येते. परंतु, सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याबाबत निर्णय घेतला जात नाही. संबंधित व्यक्तीला येणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या, त्याची तीव्रता लक्षात घेऊन त्यानुसारच सुरक्षा व्यवस्था पुरवायची की नाही याचा निर्णय घेतला जातो, असे ते म्हणाले.
दरम्यान, आपण सुरक्षा मागितलेली नाही त्यामुळे थकबाकीचा प्रश्नच नाही. पोलिसांकडूनच आपल्याला सुरक्षा देण्यात आली आहे, असे वकील माजिद मेमन यांनी म्हटले आहे.