राज्यात तिसऱ्या टप्प्यात १९ मतदारसंघांमध्ये सरासरी ५५ टक्के मतदान झाले. मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये ५३ टक्के मतदान झाले असून, राज्यात एकूणच गतवेळच्या तुलनेत मतदानात दहा टक्के वाढ झाली आहे. राज्यातील एकूण ४८ मतदारसंघांमध्ये सरासरी ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे.
पहिल्या दोन टप्प्यांत राज्यात सरासरी ६३ टक्के मतदान झाल्याने मुंबई, ठाण्यातही मतदान वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मुंबईतील मतदारांचा निरुत्साह लक्षात घेता किती मतदान वाढेल याबाबत साशंकता होती. मुंबईत मतांचा टक्का वाढावा म्हणून जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. या पाश्र्वभूमीवर मुंबईत सरासरी १० टक्के मतदानात वाढ झाली आहे. गुरुवारी मतदान झालेल्या १९ मतदारसंघांमध्ये ५५.३३ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी दिली. आजच्या मतदानात कल्याणमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे ४२ टक्के मतदान झाले. भिंवडीत मुस्लिमबहुल विभागात कमी मतदान झाल्याने सत्ताधारी काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. राज्यात २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीत ५० टक्के मतदान झाले होते. यंदा यात दहा टक्क्यांनी वाढ होऊन ही टक्केवारी ६० टक्क्यांवर गेली आहे.
मुलुंडमध्ये अधिकाऱ्यांना घेराव
मतदार यांद्यामधील नावांच्या चुका, अनेकांची नावे गायब होणे आदी प्रकारांमुळे संतप्त झालेल्या मतदारांनी ईशान्य मुंबई मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घातला. मतदार यादीत नावच नाही, यादीत नाव एकाचे, त्यावरील छायाचित्र दुसऱ्याचे तर पत्ता तिसऱ्याचाच असेही अनेक प्रकार घडल्याने अनेक मतदारांना मतदान न करताच परत फिरावे लागले. या घोळामुळे मुलुंड पूर्वमध्ये मतदारांच्या संतापाचा उद्रेक झाला. सुमारे दोनशे मतदारांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हल्लबोल केला. मात्र पोलिसांनी या जमावास बाहेरच रोखले. भाजपाचे उमेदवार किरीट सोमय्या यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मतदार याद्यांमधील घोळ हा गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा असल्याचा गुन्हा मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.
मतदानाची टक्केवारी
उत्तर मुंबई (५२ टक्के), मुंबई उत्तर-पश्चिम (५० टक्के), ईशान्य मुंबई (५३ टक्के), मुंबई उत्तर-मध्य ( ५२ टक्के), दक्षिण-मध्य मुंबई (५५ टक्के), दक्षिण मुंबई (५४ टक्के), ठाणे (५२ टक्के), कल्याण (४२ टक्के), भिवंडी (४३ टक्के), पालघर (६० टक्के), रायगड (६४ टक्के), नंदुरबार (६२ टक्के), धुळे (५९ टक्के), जळगाव (५६ टक्के), रावेर (५८ टक्के), जालना (६३ टक्के), औरंगाबाद (५९ टक्के), दिंडोरी (६४ टक्के), नाशिक (५८ टक्के).
निवडणूक कर्मचारी महिलेचा मृत्यू
ठाणे लोकसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान सुरू असतानाच खोपट एसटी स्टॅण्डमधील मतदान केंद्रावरील महिला अधिकारी वैशाली विठ्ठल भाले (३७) यांचा मृत्यू झाला. चक्कर येऊन त्या पडल्या. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात राहणाऱ्या भाले नेरूळ येथील न्यू बॉम्बे विद्यालयात मुख्याध्यापक होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास असल्याने डॉक्टरांनी त्यांना एसीजी तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, निवडणूक देशाचे काम असल्यामुळे ते आटोपल्यावरच तपासणी करण्याचे त्यांनी ठरविले होते.