द्रुतगती घात मार्ग
मार्ग द्रुतगती. वेग सराट. हवा पावसाळी. अशा वेळी पनवेलहून निघताना, पोलिसांच्या भयाने म्हणा वा विसरल्यामुळे म्हणा, पोटात मद्याचे प्याले रिचविण्याचे राहून गेले, तरी चिंता नाही. द्रुतगती महामार्गावरील प्रवासात त्याचीही व्यवस्था आहे. शिवाय त्यासाठी मद्यपींना संपूर्ण व्यवस्थेचेही पूर्ण सहकार्य आहे.
मुंबईहून एकदा या मार्गावर गाडी आली की, पनवेलपासून अवघ्या दहा किमी अंतरावर शेडूंग फाटा येतो. महामार्गावरून तेथे उतरायचे. जरा पुढे गेले की शेडूंग टोलनाका लागतो. तेथे टोलचे ३५ रुपये भरून निघायचे की, लगेचच रस्त्याच्या कडेला ढाबे लागतात. तेथे खायचे, प्यायचे आणि पुढे त्याच रस्त्याने द्रुतगती मार्गावर यायचे. माहितगारांचा हा नेहमीचा शिरस्ता बनलेला आहे. एखाद्यास त्या टोलचे ३५ रुपये भरायचे नसतील तर त्याच्यासाठीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. ती खालापूर फूडमॉलच्या परिसरात. तेथे जाऊन जरा चौकशी केली की कोणत्या टपरीवर मद्यविक्री चालते ते सहजी समजते. या सेवेचा लाभ अनेक जण घेत असतात हेही थोडय़ाशा अधिक चौकशीतून समजते. द्रुतगती मार्गाच्या कडेला कचऱ्यात पडलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या याची साक्ष देत असतात.
या मार्गावरून रोज सुमारे बारा हजार वाहने प्रवास करतात, असे सांगण्यात येते. या काळात मद्यपी वाहनचालक ही मोठीच समस्या महामार्ग पोलिसांपुढे असते. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याची घोषणा नुकतीच मंत्रीस्तरावरून करण्यात आली. मात्र ती घोषणा म्हणजे पोकळ वारेच ठरणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलिसांकडे मद्यपींची तपासणी करण्याकरिता अवघे दोन ब्रीथ अनालायझर’ आहेत. तीही पडून आहेत. कारवाई करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळच गृहखात्याने पुरविलेले नसल्याचे उघड झाले आहे.