मुंबईतील चेंबूर भागात मागील आठवड्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत महानगरपालिकेने दरड-प्रवण अशा मुंबईतील ५८ नव्या ठिकाणांची यादी जाहीर केली. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या आपातकालीन नागरी विभागाने मुंबईच्या २४ प्रभागांमधील दरड कोसळण्याच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या स्थळांची पुर्नपाहणी करण्याचे आदेश दिले. या संपूर्ण पाहणीनंतर जाहीर करण्यात आलेल्या यादीत मुंबईतील ३२१ ठिकाणे दरड-प्रवण क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश म्हणजे १८८ ठिकाणे ही खासगी मालकीची आहेत, तर ९४ ठिकाणे ही तहसीलदार मालकीची जमीन असणाऱ्या हद्दीत मोडतात. उर्वरित ठिकाणे ही मुंबई महानगरपालिका(३१) आणि म्हाडा(६) यांच्या अखत्यारित येतात. यापूर्वी पावसाळ्यातील पूर्वतयारीच्यावेळी पालिकेने दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या २६३ संवेदनशील ठिकाणांची यादी जाहीर केली होती. मात्र, चेंबुरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्यादृष्टीने करण्यात आलेल्या पाहणीत प्रभागवार दरड-प्रवण क्षेत्रे निश्चित करण्यात आल्याचे समजते. या ठिकाणांवर प्रभागवार नजर टाकल्यास ‘एस’ प्रभागाच्या हद्दीतील भांडूप आणि कांजूरमार्ग भागात सर्वाधिक १६३ दरड-प्रवण क्षेत्रे आहेत. त्या खालोखाल ‘एन’ प्रभागातील घाटकोपर आणि विक्रोळी भागातील ४३ ठिकाणे दरड कोसळण्याच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.