दारूच्या नशेत ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण गुप्ता (२२) असे या आरोपीचे नाव आहे. गुप्ता पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा परिचित होता. मुलीचे वडील व गुप्ता याच भागातील एका किराणा मालाच्या दुकानात काम करीत होते. गुप्ता त्यांच्या घरी येत-जात असे. मंगळवारी सकाळी गुप्ताचे मुलीच्या वडिलांशी पैशावरून भांडण झाले होते. त्यामुळे संध्याकाळी तो त्यांच्या घरी गेला आणि त्याने मुलीला संतोषनगर येथील आपल्या घरी खेळायला आणले. तेथे मद्याच्या नशेत त्याने मुलीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने मुलीला घरी सोडले आणि पळून गेला. जखमी अवस्थेतील मुलीला केईएम रुग्णालयात दाखल केले. दिंडोशी पोलिसांनी फरारी गुप्ताला बलात्कार, अपहरण आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये (पोस्को) अटक केली आहे.