साकीनाका परिसरातून एका सहा वर्षांच्या मुलाचे रविवारी दुपारी अपहरण करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी अथक मेहनत करीत अवघ्या तीन तासांमध्ये त्याला शोधले.
साकीनाका येथील सत्यनगर पाईप लाईन जवळील प्रभात वाडीत राहणाऱ्या अयान निसार चौधरी हा सहा वर्षांचा मुलगा रविवारी दुपारी ३ च्या सुमारास गायब झाला. तो न सापडल्यामुळे त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. अयानच्या वडिलांचे जवळच्याच परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेशी अनैतिक संबंध होते. रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास ते या महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले असता या दोघांचे भांडण झाले. चौधरी यांना धडा शिकविण्यासाठी तिने अयानचे अपहरण केले. चौकशीत या महिलेवर संशय बळावला आणि पोलिसांचा अंदाज खरा ठरला. अवघ्या तीन तासांत अयानची सुटका झाली.