अँड्रॉइड मोबाइलवर व्हायरसचा धोका ही काही नवी बाब नाही, पण आता गुगलने अँड्रॉइडच्या ४.४ म्हणजेच किटकॅट व्हर्जनपेक्षा जुन्या व्हर्जन्सना सुरक्षा अद्ययावत करण्याचे थांबविल्यामुळे हा धोका अधिक वाढणार असून, याचा फटका तब्ब्ल ६० टक्के अँड्रॉइड मोबाइलधारकांना बसणार आहे.
स्मार्टफोनमध्ये सातत्याने व्हायरसेसचे आक्रमण होत असते. यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करणाऱ्या कंपन्या वेळोवेळी सुरक्षेचा भाग अद्ययावत करत असतात. यामुळे वेळोवेळी येणारे व्हायरसेस थांबविणे शक्य होत असते. पण आता गुगलने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमच्या ४.४ व्हर्जनपेक्षा आधीच्या व्हर्जनला सुरक्षा अद्ययावत करण्याची प्रणाली बंद करण्याचे जाहीर केले. यामुळे या व्हर्जनच्या खालची ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्यांच्या स्मार्टफोनचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. म्हणजे या फोन्समध्ये व्हायरस शिरले तर त्यावर कोणत्याही प्रकारे अधिकृतपणे पॅचिंग करता येणार नाही. परिणामी फोनमध्ये व्हायरस शिरला, तर त्यावर कोणताही तोडगा काढणे शक्य होणार नाही. सध्या जागतिक बाजारपेठेत अँड्रॉइड फोनधारकांची संख्या सर्वाधिक असून, यातील बहुतांश हे किटकॅटच्या आधीच्या व्हर्जनचे म्हणजे आइस्क्रीम सॅण्डविच आणि जेलीबीन या दोन ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणारे आहेत. अद्ययावत ऑपरेटिंग प्रणाली वापरावी या उद्देशाने गुगलने हा निर्णय घेतल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
या निर्णयामुळे काय होणार?
आपल्या फोनमध्ये भविष्यात एखादा व्हायरस शिरला, तर त्यासाठी कंपनीकडून कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्या व्हायरसला किंवा मालवेअर्सला रोखणे कठीण होणार असल्याचे क्विक हील टेक्नॉलॉजीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी संजय काटकर यांनी स्पष्ट केले. यामुळे जर मोबाइलमध्ये शिरलेला मालवेअर किंवा व्हायरस अधिक प्रमाणात वाढला, तर कदाचित फोन बदलण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच सध्या अँड्रॉइडवर ३० ते ४० हजार मालवेअर्स आढळत आहेत. यावरून धोक्याची जाणीव होऊ शकते, असे ते म्हणाले.

उपाय व काळजी काय
’मोबाइलचा अपघात टाळण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाइलमध्ये जर अँड्रॉइड ४.४ सपोर्ट होत असेल आणि सध्या तुम्ही जुनी ऑपरेटिंग प्रणाली वापरत असला, तर प्रणाली अद्ययावत करून घ्या.
’तुमच्या मोबाइलमध्ये अँटीव्हायरस असेल तर नक्कीच तुमचा फोन सुरक्षित राहू शकतो.
’प्रणाली अद्ययावत नाही केली किंवा फोनमध्ये अँटीव्हायरस नसेल तर त्या फोनमधून बँकेचे व्यवहार करणे थांबवा.
’तुमच्या माहितीचा बॅकअप घेऊन ठेवा.