तिघांना अटक, कोटय़वधींच्या उलाढालीचा संशय

मुंबई गुन्हे शाखेने कुल्र्यात छापा घालून ६५ लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत केल्या. चलनातून बाद झालेल्या या नोटा कमिशनवर बदलून घेण्याच्या धडपडीत असलेल्या तीन तरुणांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या तिघांचे तपशील आयकर विभाग आणि रिझव्‍‌र्ह बँकेला कळविण्यात येतील. या तिघांनी चलनबंदीनंतर कमिशन घेऊन-देऊन कोटय़वधींच्या जुन्या नोटा बदलून घेतल्याची माहिती गुन्हे शाखेकडे आहे. त्या दृष्टिकोनातून तिघांकडे चौकशी व खातरजमा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

कांतीलाल शहा, रवी शहा आणि येवले अशी तिघांची नावे आहेत. सोमवारी रात्री हे तिघे लाखोंच्या जुन्या नोटा घेऊन बाहेर घराबाहेर पडणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ३चे प्रभारी निरीक्षक सुनील माने यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने कुर्ला-सीएसटी रोडवर पाळत ठेवून या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यापैकी कांतीलालकडून तब्बल ४९ लाखांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या.

उर्वरित दोघांकडून सहा व दहा लाख रुपयांचे बाद चलन सापडले. भाडय़ाच्या गाळ्यात मोबाइल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कांतीलालने नोटा बदलून देण्याच्या शब्दावर सुमारे आठ ते दहा जणांकडून हे बाद चलन गोळा केले होते. या बदल्यात त्याला २० टक्के कमिशन मिळणार होते, अशी माहिती समोर आली.