राज्याला ३०० मेगावॉट वीज मिळणार
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचा नागपूरजवळील मौदा येथील वीजप्रकल्पाचा पहिला ६६० मेगावॉटचा संच ४ जानेवारी रोजी सुरू होत आहे. त्यातून महाराष्ट्राला ३०० मेगावॉट वीज उपलब्ध होणार आहे.
मौदा येथील हा वीजप्रकल्प १३२० मेगावॉट क्षमतेचा आहे. प्रत्येकी ६६० मेगावॉटचे दोन संच तेथे उभारण्यात आले आहेत. ४ जानेवारी रोजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत पहिल्या ६६० मेगावॉटचा संच सुरू होणार आहे. नियोजनाप्रमाणे २०१२ मध्ये हा वीजप्रकल्प सुरू होणार होता.
या प्रकल्पातील वीज डिसेंबर २०१२ च्या भारनियमनमुक्तीच्या योजनेत गृहीत धरण्यात आली होती. या वीजसंचातून दोन-तीन महिन्यांत पूर्ण क्षमतेने सलग ६६० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू होण्याची अपेक्षा आहे. तेव्हा राज्याला या प्रकल्पातून ३०० मेगावॉट वीज मिळेल.