मालगाडी रुळावरून घसरली; प्रवाशांचे हाल ’ ७० गाडय़ा रद्द; १५० रखडल्या
हार्बर मार्गावरील वाहतूक सलग तिसऱ्या दिवशी, शुक्रवारीही विस्कळीत झाली. पहाटे चारच्या सुमारास खडी वाहून नेणाऱ्या मालगाडीचा एक डबा रुळावरून घसरल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वडाळा या मार्गावरील वाहतूक साडेतीन तास बंद होती. यामुळे तब्बल ७० गाडय़ा रद्द तर १५० हून अधिक गाडय़ा विस्कळीत झाल्या. परिणामी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
हार्बर मार्गावर शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास खडी वाहून नेणाऱ्या मालगाडीचा एक डबा रुळावरून घसरल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वडाळा स्थानकादरम्यान वाहतूक सेवेला फटका बसला. हा डबा गाडी रूळ बदलते त्याच ठिकाणी घसरल्याने संपूर्ण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. हा डबा घसरल्याची माहिती मिळताच रेल्वे अपघातासाठी विशेष गाडी रवाना करण्यात आली. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले. सकाळी सातच्या सुमारास हा डबा सुरक्षितपणे उचलून इतर डब्यांना जोडण्यात आला. त्यानंतर सव्वासातच्या सुमारास हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र दुरुस्ती कामानंतरही दुपारी उशिरापर्यंत हार्बर मार्गावरील वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होती. सुदैवाने पहाटेच्या सुमारास हा डबा घसरल्याने ऐन गर्दीच्या वेळेस प्रवाशांना मोठा फटका बसला नसल्याचे सांगण्यात आले.