विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना ‘प्रवेश नियंत्रण समिती’ची मान्यता न घेताच त्यांना परीक्षेला बसविणाऱ्या बदलापूरच्या ‘भारत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’ला मुंबई विद्यापीठाने अखेर सुमारे ७२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. महाविद्यालयाला ७१८ विद्यार्थ्यांमागे प्रत्येकी १० हजार रुपयेहा दंड ठोठावला आहे.
वर्षभरापूर्वी ‘लीलावती आव्हाड इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महाविद्यालयाने गेली चार वर्षे हा घोळ चालविला होता. नियमाप्रमाणे प्रत्येक व्यावसायिक खासगी महाविद्यालयाला ‘प्रवेश नियंत्रण समिती’कडून प्रवेशांना मान्यता घ्यावी लागते. परंतु, २०१०-११ मध्ये ३६० जागांच्या प्रवेशक्षमतेला ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ची मान्यता मिळालेल्या या महाविद्यालयाने तेव्हापासून नंतरच्या चार वर्षांत एकदाही समितीकडून विद्यार्थ्यांच्या प्रवेश यादीला मान्यता घेतली नव्हती. यामुळे, विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने रोखले. ‘लोकसत्ता’ने २९ मार्च, २०१४च्या अंकात या संबंधात वृत्त दिले होते. हा घोळ पहिल्याच वेळेस विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेला सामोरे गेले तेव्हाच खरे तर उघडकीस यायला हवा होता; परंतु विद्यापीठाने हलगर्जी केली. दरम्यान, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने विद्यापीठाला संबंधित महाविद्यालयावर कारवाईची सूचना केली. त्यानंतर विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे निकाल रोखले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रवेश नियंत्रण समिती, तंत्रशिक्षण संचालनालयाने कठोर भूमिका घेण्याचे टाळून विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना मान्यता दिली. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या हातात निकाल पडले आहेत.
विद्यापीठाच्या ‘व्यवस्थापन परिषदे’ने २८ मे रोजी झालेल्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती राजेंद्र सिंह यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळविलेल्या कादपत्रांवरून स्पष्ट होते. ‘विद्यापीठाने काही अटींवरच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले होते. त्यानुसार महाविद्यालयाला दंड करण्यात आला आहे,’ असे विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. खान यांनी सांगितले.

विद्यापीठाकडून आर्थिक दंडाबाबत कोणतेही पत्र अद्याप भारत महाविद्यालयाला मिळालेले नाही; तसेच, असा काही दंड ठोठावला असेल तर त्याची रक्कम विद्यार्थ्यांकडून वसूल केली जाणार नाही.
एस. एन. बरई, प्राचार्य

आव्हाड ते भारत..
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मातोश्रींच्या नावाने हे महाविद्यालय पूर्वी ओळखले जाई. मात्र, मार्च, २०१४ मध्ये घोळ उघडकीस आल्यानंतर आव्हाड यांनी महाविद्यालयाच्या नावावर आक्षेप नोंदविला. पक्ष कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात गोंधळ घालून आव्हाड यांच्या मातोश्रींच्या नावे असलेला फलक काढायला लावला. त्यानंतर नामकरण भारत महाविद्यालय असे झाले.