अंबरनाथ शहरात डेंग्यूसदृश तापाचे ग्रस्त आठ रुग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांवर पालिकेच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंबनाथ पश्चिमेतील कमलाकरनगर, पनवेलकर गार्डन, कोहोज गाव आदी परिसरातील चार्वी सुब्रमणीयम् (७), बिना सुब्रमणीयम (९), मार्टीन बंडी (२१), साक्षी जाधव (१२), शमीम बुडे (१२), सुनीता चलवादी (२१), मुमताज शेख (३०), वनेश्वरी (३४) अशी या रुग्णांची नावे आहे. ताप आल्याने त्यांना पालिका रुग्णालयात दाखल केले आहे, असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. आठही रुग्णांचा वैद्यकीय अहवालात शासकीय आरोग्य विभाग आणि शासकीय रुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती, छाया रुग्णालयाच्या डॉ. आशा रायबोळे यांनी दिली. आठ दिवसांपूर्वी यश चनई हा सातवर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. डेंग्यूसदृश तापाने ग्रस्त असलेल्या रुग्णास आवश्यक ते उपचार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सांगितले आहे. याप्रकरणी शनिवारी सकाळी ११ वाजता आढावा बैठक घेऊन आरोग्य यंत्रणेस सज्ज करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.