भिवंडी येथील राहनाळ गावातील मढवी कंपाऊंडमध्ये मोकळ्या जागेत ठेवलेल्या लाकडी फ्रेमच्या भंगारास शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत भंगाराशेजारीच असलेल्या झोपडय़ांमध्ये झोपलेल्या आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन कामगार गंभीररीत्या जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. रौद्ररूप धारण केलेल्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांना सुमारे सात ते आठ तासांचा कालावधी लागला. mu08

राहनाळ गावातील मढवी कंपाऊंडमधील मोकळ्या जागेत लाकडी फ्रेमचे भंगार ठेवण्यात आले असून त्याच्या शेजारीच तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या झोपडय़ा आहेत. शुक्रवारी मध्यरात्री लाकडी फ्रेमच्या भंगाराला आग लागली. लाकूड असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. कामगार गाढ झोपेत असतानाच या आगीचे लोळ कामगारांच्या झोपडय़ांपर्यंत पोहोचले. आग लागल्याचे कळताच कामगारांनी झोपडय़ांबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण आगीने चारही बाजूंनी वेढल्यामुळे त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. या आगीत रामदयाल ऊर्फ अजय राजभर, राजू चौहान, गैरी चौहान, कालिया हरिजन, मुन्नीलाल यादव, मुरली मौर्या, तिलाक्रम, नीरज कुर्मी या आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर गिरे चौहान, बहादूर चौहान व विनोद यादव हे तिघे जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले, विनोदची प्रकृतीही चिंताजनक असल्याने त्याला मुंबई येथे नेण्यात आले.mu09

चौघांविरोधात गुन्हा..
मनोहरअली खान, इस्तियाक अहमद उस्मानअली या दोघांचा लाकडी फ्रेमचा तर शौकतअली उस्मान अन्सारी याचा प्लॉस्टिक भंगाराचा व्यवसाय आहे. राहनाळ गावातील मढवी कंपाऊंडमध्ये राजन मढवी यांची जागा असून तिथे गोदामे आहेत. या गोदामाशेजारी असलेली मोकळी जागा राजन यांनी या तिघांना महिना दोन हजार रुपये भाडय़ाने दिली होती. या जागेमध्ये तिघांनी कोणतीही परवानगी नसतानाही लाकडी फ्रेम आणि प्लॉस्टिकचे भंगार ठेवले होते. शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत भंगाराचे साहित्य जळून खाक झाले असून सुमारे ३२ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेत आठ कामगारांचा मृत्यू आणि तीन कामगार जखमी झाल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी भंगार व्यवसायिक मनोहरअली, इस्तियाक आणि शौकतअली या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर जागा मालक राजन मढवी यांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांनी दिली.