गेल्या दहा वर्षांच्या सरासरीनुसार मुंबईतून प्रत्येक महिन्याला ८८४ जण बेपत्ता होत असल्याचे धक्कादायक सत्य मुंबई पोलीसांनी प्रकाशित केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींचा मोठ्याप्रमाणावर समावेश असल्याचे दिसून आले आहे. गुन्हे अन्वेषण शाखेने (सीआयडी) प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या साडेदहा वर्षांमध्ये मुंबईमध्ये एकूण १,१०,५४७ लोक हरवल्याची तक्रार करण्यात आली होती. यापैकी १,००,४३९ जणांचा शोध लागला असून १०,१०८ जण अजूनही बेपत्ताच आहेत. जानेवारी २००५ ते मे २०१५ या काळातील ही आकडेवारी असून यामध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींमध्ये पुरूषांच्या तुलनेत अल्पवयीन मुली आणि महिलांचे प्रमाण जास्त आहे.
मुंबई पोलीसांकडे गेल्या दहा वर्षांत १८,५४७ मुली, ३७,६०३ महिला, १७,१९५ मुले आणि ३७,२०२ पुरूष बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे महिन्याच्या सरासरीनुसार ८८४पैकी ८०३ म्हणजे ९० टक्के लोकांना शोधून काढण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. मात्र, मे २०१५च्या अखेरपर्यंत ५८२ मुली आणि २,९४४ महिला बेपत्ताच असल्याचे या माहितीतून उघड झाले आहे. विभागनिहाय आकेडवारीनुसार गेल्या सात महिन्यांमध्ये मुंबईच्या पूर्व भागात लोक हरविल्याच्या सर्वाधिक १,७१७, त्यापाठोपाठ पश्चिम मुंबईत १,१७४, उत्तर मुंबईत १,५६०, मध्य मुंबईत १,०८५ आणि दक्षिण मुंबईत ३६० तक्रारींची नोंद झाली आहे. मुंबईच्या उत्तर भागात ५० टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत असल्याने या भागातून लोक बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील यांनी दिली. मात्र, आमच्याकडे आलेल्या तक्रारींपैकी ९७ टक्के प्रकरणांचा छडा लावण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या उपलब्ध असलेले तंत्रज्ञान आणि सोशल मिडीयामुळे लोकांना शोधण्यात खूप मदत होत असल्याचेही फत्तेसिंग पाटील यांनी म्हटले आहे.