संत नामदेव यांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे झाले. पंजाब ते काश्मीर या दरम्यान काम बघणारी सरहद्द संस्था या संमेलनाच्या आयोजनाचे काम करत आहे. हे संमेलन कोणत्याही वादांशिवाय पार पडावे, अशा सदिच्छा उद्धव ठाकरे यांनी बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी दिल्या.
या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, सरहद्द संस्थेचे संजय नहार, बोधचिन्हाचे आर्टिस्ट ख्वाजा सैय्यद आणि आमदार नीलम गोऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.साहित्य संमेलन हा मराठी भाषेचा उत्सव आहे. या उत्सवादरम्यान कोणतेही वादविवाद होऊ नयेत. संमेलन सामोपचाराने पार पडायला हवे, अशी सदिच्छा उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते यंदाच्या साहित्य संमेलनाची सुरुवात व्हावी, अशी इच्छा अ. भा. मराठी साहित्य मंडळाने या वेळी व्यक्त केली.
विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागे जाणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाले यंदा फिरत्या घराचा अंदाज घेत शिवसेनेकडे धाव घेतल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. दरम्यान, हे बोधचिन्ह निवडताना ८० बोधचिन्हांचा विचार करण्यात आला होता. त्यातून सर्वानुमते या बोधचिन्हाला पसंती देण्यात आली. अशी माहिती डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.