१० सप्टेंबर रोजी संमेलन स्थळाची घोषणा

डोंबिवलीत झालेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर मराठी साहित्य वर्तुळाला आता ९१व्या साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत. साहित्य संमेलन आयोजनात दिल्ली, बडोदा, बुलढाणा यांच्यात चुरस असली तरीही दिल्ली बाजी मारण्याची अधिक शक्यता आहे. येत्या १० सप्टेंबर रोजी साहित्य संमेलन स्थळाची घोषणा केली जाणार आहे.

साहित्य संमेलन आयोजनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे सहा ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. त्यांपैकी दिल्ली मराठी प्रतिष्ठान (दिल्ली), मराठी वाङ्मय परिषद (बडोदा), विवेकानंद आश्रम-हिवरा (जिल्हा बुलढाणा) या तीन ठिकाणी भेटी द्यायचे महामंडळाने ठरविले. त्यानुसार महामंडळाच्या स्थळनिवड समितीने दिल्ली आणि बडोदा येथे भेट दिली असून विवेकानंद आश्रम हिवरा-बुलढाणा येथेही लवकरच भेट दिली जाणार आहे.  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि निमंत्रक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती निमंत्रण स्थळांना (त्या त्या ठिकाणी) भेट देऊन पाहणी केल्यानंतर आपला अहवाल व शिफारस महामंडळाकडे सादर करते. त्यानंतर स्थळनिवड समिती व महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलन स्थळाची निवड केली जाते.

महामंडळाची स्थळ निवड समिती प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबतचा आपला अहवाल महामंडळाला सादर करेल. त्यानंतर संमेलन स्थळावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल.

– डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

वर्ष     स्थळ   अध्यक्ष

१९०९  बडोदा   कान्होबा रणछोडदास कीर्तीकर

१९२१  बडोदा   नरसिंह चिंतामणी केळकर

१९३४  बडोदा   नारायण गोविंद चाफेकर

१९५४  दिल्ली  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी