महसूल विभागालाही मागे टाकले
चिरीमिरी घेऊन लोकांची कामे करण्यात पोलिसांनी महसूल विभागालाही मागे सोडले आहे. पोलिसांमध्येही लाचखोरीत वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांनी आघाडी घेतली असून १२ एप्रिलपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात एकूण ९९ पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे, तर महसूल विभागातील ९६ कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी कामे करण्यासाठी जनतेला पशांसाठी नाडणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. लाच मागणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच, कर्मचाऱ्यांच्या वतीने पसे मागणाऱ्या दलालांनाही लाचखोरीच्या गुन्ह्य़ात अटक करण्यात येते. दिवसरात्र जनतेशी संपर्क येणाऱ्या आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांमध्येच लाचखोरीची वृत्ती बोकाळल्याचे दिसून येत आहे. एरव्ही मलईदार खाते असलेल्या महसूल विभागात लाचखोरीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत होते. मात्र २०१६ मध्ये पोलिसांनी लाचखोरीत महसूल विभागालाही मागे सोडले आहे. १२ एप्रिलपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत राज्यभरातील एकूण ९९ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लाच घेताना किंवा मागितल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर महसूल विभागातील ९६ कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही विभागांच्या पाठोपाठ पंचायत समिती विभागातील कर्मचाऱ्यांचा क्रमांक असून ३९ कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले.

लाचखोरीच्या तक्रारींत मुंबईकर उदासीन
सर्व सरकारी यंत्रणांची मुख्यालये असलेल्या मुंबईत लाचखोरीची तक्रार करण्यात उर्वरित राज्यांच्या तुलनेत कमी उत्साह असल्याचे लाचलुचपत विभागाचे निरीक्षण आहे. विभागाच्या आठ विभागांमध्ये २०१६ मध्ये लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे औरंगाबाद (५५ सापळे ) मध्ये नोंदविण्यात आली, त्यापाठोपाठ पुणे (५२), नाशिक (४४) यांचा क्रमांक आहे. मुंबई या कारवाईत सर्वात तळाला (३० सापळे) आहे.

विभाग एकूण प्रकरणे
पोलीस ९९
महसूल ९६
पंचायत समिती ३९
शिक्षण विभाग २१
महानगरपालिका १८
(१जानेवारी ते १२ एप्रिलपर्यंत)