नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने सोमवारी दुपारी माहीम येथे उपनगरी गाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली. शाळेने त्याच्यावर चोरीचा आळ घेतल्याने तो व्यथित झाला होता. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.
माहीम येथील एका नामांकित शाळेत दीपेश टेके (१७) हा विद्यार्था नववीत शिकत होता. तो माहीमच्या धारावी क्रॉस रोड येथे राहत होता. उत्तम खोखोपटू असलेल्या दीपेशच्या शाळेतील ‘स्पोर्ट्स’ची प्रमाणपत्रे चोरीला गेली होती. शाळेतीलच काही विद्यार्थ्यांनी ही प्रमाणपत्रे चोरल्याचा शाळेचा आरोप होता. त्यात दीपेशचाही समावेश होता. त्यामुळे दीपेशने चोरीची लेखी कबुली द्यावी, अशी अट शाळेने घातली. तसे न केल्यास शाळेतून कमी करून चारित्र्यावर विपरीत शेरा मारून दिला जाईल, असे सांगण्यात आले होते.
याबाबत दीपेशच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकांची भेट घेऊन दीपेशचा चोरीत सहभाग नसल्याचे सांगितले. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिकेने दीपेशच्या मागे तगादा लावला होता. त्यामुळे अपमानित आणि व्यथित झालेल्या दीपेशने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास माहीम रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळावर लोकलखाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या आईला दूरध्वनी करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.
सुरुवातीला आम्ही अपमृत्यूची नोंद केली, पण शाळेच्या मानसिक छळामुळे दीपेशने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले, असे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले.
माहीम पोलिसांना तसे आम्ही कळविले असून ते शाळेविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत, असेही त्रिवेदी म्हणाले. दीपेशचे पालक माहीम पोलीस ठाण्यात शाळेविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.