पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शिवडी सत्र न्यायालयातील साहाय्यक सरकारी वकील स्वाती शिंदे (५२) यांना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे अटक करण्यात आली.

या प्रकरणातील तक्रारदाराचा घरफोडीच्या आरोपासंदर्भातील खटला शिवडी सत्र न्यायालयात सुरू होता; परंतु प्रकरणाचा निकाल त्याच्या विरोधात लागला. त्यामुळे त्याविरोधात अपील करता यावे म्हणून त्याला प्रकरणाशी संबंधित प्रमाणित कागदपत्रांची गरज होती. त्याने संबंधित विभागाकडे तशी मागणीही केली होती. मात्र ती तातडीने मिळवून देण्याचे सांगत शिंदे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम खूपच जास्त असल्याचे तक्रारदाराकडून सांगण्यात आल्यानंतर शिंदे यांनी त्याच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारानेही ही रक्कम देण्याची एकीकडे तयारी दाखवली, तर दुसरीकडे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही शिंदे यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर ठरल्यानुसार तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना शिंदे यांना अटक करण्यात आली. त्या वेळी त्यांच्याकडून लाच म्हणून स्वीकारलेली ५ हजार रुपयांची रक्कमही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हस्तगत केली.