मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांच्या सगळ्या डेडलाईन संपल्या आहेत, आता याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावं आणि लवकरात लवकर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आत्तापर्यंत ज्या डेडलाईन राज्य सरकारतर्फे  देण्यात आल्या आहेत  त्या हुकल्या आहेत. या सगळ्याची नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

एवढंच नाही तर ज्यांचा निकाल अद्याप लागलेला नाही अशा मुलांच्या पालकांनी विनोद तावडेंच्या विरोधात मानसिक छळ होत असल्याची तक्रार खुशाल दाखल करावी असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता या प्रश्नी लक्ष घातलं पाहिजे, मी त्यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे त्यांना जाऊन मी भेटणार आहे आणि विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मी मागितली आहे मात्र अद्याप ती मिळालेली नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबई विद्यापीठाला निकाल लावताना अडचणींचा सामना करावा लागत असेल तर राज्य सरकारनं आयएएस किंवा आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी आणि विद्यापीठात होणारा गोंधळ थांबवावा असाही सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. मागील तीन महिन्यांपासून मुलांचे निकाल जाहीर झालेले नाहीत, याप्रकरणी कुलगुरुंना राजीनामा द्यायला सांगून भागणार नाही तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी गुरूवारीही ट्विटच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर आता शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही आदित्य ठाकरे यांनी विनोद तावडेंच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या निकालांच्या संदर्भातील तिन्ही डेडलाईन हुकल्या आहेत, यानंतर याच प्रकरणी शुक्रवारी राजभवनावर मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यासोबत  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीनंतर कोणतीही डेडलाईन त्यांनी दिलेली नाही. निकाल लवकरात लवकर लागतील एवढंच तावडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. तसंच याप्रकरणी नेमकं कोण दोषी आहे याची चौकशी करून राज्यपाल त्या व्यक्तीवर कारवाई करतील असंही आश्वासन विनोद तावडे यांनी दिलं आहे.

निकालासाठी ३१ जुलै, ५ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट अशा तीन तारखा देण्यात आल्या होत्या. मात्र या सगळ्या तारखांची डेडलाईन हुकली आहे.  विनोद तावडे यांनी निकालाबाबत सावध भूमिका घेतलेली असतानाच युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे आक्रमक झाले असून त्यांनी याप्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा असं म्हटलं आहे.