आम आदमी पक्षाचे नेते मयंक गांधी यांच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या एका प्रचार फेरीत शिक्षिकेची छेडछाड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेने मयंक गांधी यांच्यासह सहा जणांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान गांधी यांच्या प्रचारफेरीत आपच्या कार्यकर्त्यांनी आपली छेडछाड केल्याचा आरोप या शिक्षक महिलेने केला आहे. ही बाब त्याचवेळी गांधी यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्यांनी पोलिसांत तक्रार करू नकोस असे धमकावून प्रकरणात दखल घेण्यात टाळाटाळ केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी या शिक्षक महिलेने गांधी यांच्यासह तरूण सिंग, रूबीन मेसकरनिस, विनय मिश्रा, सॅम आणि रूबिना यांच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण या महिलेने तक्रार दाखल करण्यास उशीर का केला याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दरम्यान, गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा सुरू असलेल्या या प्रकरणाला कोणताही आधार नसल्याचे आपने माध्यमांना ई-मेल पाठवून स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर या ई-मेलमध्ये त्यांनी प्रसार माध्यमांना या संदर्भातील बातमी करताना प्रकरणाची शहानिशा करून घ्यावी असा दमही भरला आहे.