कचरामुक्त महाराष्ट्र आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र या दोन्ही योजनांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेता आमिर खान हे पुढाकार घेणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या जलयुक्त शिवार अभियानात जनजागृतीसाठी गावागावांत फिरण्याची तयारी आमिर खान यांनी स्वत:हून दर्शविली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नगरविकास विभागाच्या वतीने शुक्रवारी सह्य़ाद्री अथितिगृहावर स्वच्छता अभियान राबविण्याच्या संदर्भात कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित केलेल्या समारंभाला आमिर खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता म्हणून आमिर खान यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे चित्रपट सामाजिक आशय मांडणारे असतातच, शिवाय प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवरही त्यांचा अनेक रचनात्मक-प्रबोधनात्मक उपक्रमांमध्ये सहभाग असतो. राज्यात राबिवण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानातही त्यांचा सहभाग असावा म्हणून त्यांना या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित करण्यात आले होते.
महाराष्ट्रात सध्या मराठवाडा व अन्य काही भागांत भीषण दुष्काळ आहे. दर वर्षी कोणत्या ना कोणत्या भागाला दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्याबद्दल आमिर खान अस्वस्थ असल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आपल्या भाषणात सांगितले. एका कार्यक्रमात एकत्र असताना खान यांनीच महाराष्ट्रातील दुष्काळाचा विषय काढला. दुष्काळावर मात करण्यासाठी आपण काही योजना करीत असाल तर मी व माझी संपूर्ण टीम त्यात सहभागी व्हायला तयार आहे, असे त्यांनी मला सांगितले. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी सरकार जलयुक्त शिवार अभियान राबवीत असून त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. ती जबाबदारी आमिर खान यांनी स्वीकारली आहे. या अभियानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी गावागावांत फिरण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. कचरामुक्त महाराष्ट्रासाठीही ते लोकसहभाग वाढविण्याकरिता जनजागृती करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.