आम आदमी पक्षाचे(आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी पक्षनिधी गोळा करण्याच्या मोहिमेवर आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरूवारी मुंबईमध्ये केजरीवालांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या स्नेहभोजनसाठी इच्छुकांना वीस हजार रूपयांचे शुल्क मोजावे लागणार आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकांच्यावेळीही मुंबई आणि नागपूरमध्ये ‘आप’कडून अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबईनंतर ३० नोव्हेंबर रोजी दिल्लीतही अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
केजरीवाल यांनी महाराष्ट्रातून चार कोटींच्या निधी संकलनाचे लक्ष्य समोर ठेवले आहे. तर, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांतून अनुक्रमे तीन आणि दोन कोटी स्नेहभोजनाच्या माध्यमातून जमवण्याचा केजरीवाल यांचा कयास आहे. याशिवाय ‘आप’कडून विविध माध्यामातून पक्षनिधी उभारण्यात येत आहे. यामध्ये मोबाईल अॅप, सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही निधी देण्याचे आवाहन पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. ‘आप’च्या राज्यस्तरावरील समित्यांनाही निधी संकलनासाठी विशिष्ट लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे.