खडसेंचा खुलासा; चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मंत्रालयाच्या दारातच गजानन पाटील नावाच्या व्यक्तीला लाच घेताना पकडल्यामुळे अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना कराची येथून कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून दूरध्वनी आल्याचा आरोप करून आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ खडसे यांनी मात्र हा आरोप फेटाळून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
दाऊदच्या घरातून ज्या मोबाइल क्रमांकावरून दूरध्वनी आल्याचा मेनन यांचा आरोप आहे, तो आपला नंबर गेल्या वर्षभरापासून बंद आहे, असे खडसे यांनी या संदर्भात केलेल्या खुलाशात म्हटले आहे.
या कालावधीत या क्रमांकावरून एकही दूरध्वनी परदेशात केलेला नाही किंवा परदेशातून आलेला नाही. कदाचित आपला नंबर क्लोन करून त्याचा गैरवापर करण्यात आला असावा, असे त्यांचे म्हणणे आहे. माझा मोबाइल नंबर कुणी वापरत आहे का, याची चौकशी करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री फडणवीस व जळगावच्या पोलीस अधीक्षक यांना केली आहे, असे खडसे यांनी सांगितले.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या मोबाइलवर दाऊद इब्राहिमच्या मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. त्यानंतर आम्ही खडसे यांच्या मोबाइलचे सर्व रेकॉर्ड्स तपासले आहेत. आमच्या प्राथमिक तपासणीनुसार सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत दाऊद इब्राहिमच्या कोणत्याही क्रमांकावरून खडसे यांच्याशी संपर्क झाला नाही किंवा खडसे यांनी अशा कोणत्याही क्रमांकावर संपर्क केला नाही, असे आढळून आले आहे.
– अतुलचंद्र कुलकर्णी, सह-आयुक्त (गुन्हे)