पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आरे वसाहतीतील कृषी उद्योग भवनाजवळील दिनकरराव देसाई मार्गाच्या नाल्यावरील पूल बुधवारी रात्री खचला. त्यामुळे आरेतील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून ही वाहतूक ‘जेव्हीएलआर’मार्गे वळवण्यात आली आहे. परिणामी आरे चेकनाका ते अंधेरीच्या दिशेला पश्चिम द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी भीषण वाहतूक कोंडी झाली होती.

आधीच मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात आरेतील वाहतूक वळवण्यात आल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. त्यामुळे या मार्गावर जोगेश्वरीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या पाहायला मिळत आहेत. आरेतील वाहतूक युनिट क्रमांक दोन व तीनमधील अंतर्गत रस्त्यावरून गोरेगाव चेकनाका येथे पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे रॉयल पाम ते युनिट क्रमांक पाचपर्यंत पोचायला दीड ते दोन तास लागत आहेत. त्यामुळे पालिकेने हा पूल लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी करत आहेत. या पुलाच्या दुरुस्तीबाबत पालिकेच्या पूल विभागाला कळविण्यात आले आहे. ते लवकरच पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतील, असे पालिकेच्या पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त चंदा राव यांनी सांगितले.

‘पूर्वी हे अंतर काही मिनिटांत पार करणे शक्य होते. मात्र मेट्रोची कामे आणि त्यात आता आरेतील वळविण्यात आलेली वाहतूक यामुळे येथून प्रवास करणे त्रासदायक ठरते आहे. वाहतूक कोंडीमुळे कार्यालयात पोहोचण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो,’ असे या मार्गाने प्रवास करणारे संदीप नाईक यांनी सांगितले, तर ‘मेट्रो होईपर्यंत या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. मेट्रो झाल्यावर तरी परिस्थिती बदलेल, अशी अपेक्षा आहे. पण वाहतूक पोलिसांनी या परिसरातील मार्ग अतिक्रमणापासून मोकळे केले तरी वाहनचालकांना दिलासा मिळेल,’ असे वाहनचालक संजय पाटील म्हणाले. वाहतूक कोंडीबाबत गोरेगावच्या वाहतूक विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.