शास्त्रीय संगीतातील रागदारी ते सुगम संगीतातील सहजभाव दोन्हीकडे ज्यांचे नाव कौतुकाने घेतले जाते त्या आजच्या पिढीच्या गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्याशी गप्पा मारण्याची संधी लोकसत्ताच्या ‘व्हिवा लाऊंज’ या उपक्रमात मिळणार आहे. सात सुरांशी खेळताना त्यातली अभिजातताही जपायची आणि गाण्यातली नजाकतही खुलवायची, हे आव्हान सगळ्यांनाच पेलवणारे नाही. शास्त्रीय संगीत असो, सुगम संगीत असो नाहीतर सदाबहार लावणी असो, तितक्याच सहजतेने आपले गाणे गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची कला या गायिकेला गवसली आहे. ही कला त्यांनी कशी साधली, याचे गुपित १८ फेब्रुवारीला व्हिवा लाऊंजच्या निमित्ताने उलगडणार आहे.
आरती अंकलीकर-टिकेकर या जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका. त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरवले ते आग्रा ग्वाल्हेर घराण्याच्या पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे.
त्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या गानसरस्वती किशोरीताई अमोणकर या त्यांना गुरूस्थानी लाभल्या. पंडित दिनकर कायकिणी, पंडित उल्हास कशाळकर अशा शास्त्रीय संगीतातील दिग्गजांकडून त्यांनी संगीताची दीक्षा घेतली. मात्र, या सगळ्यांकडून गाणे शिकणाऱ्या आरती अंकलीकर-टिकेकर यांनी स्वत:ची अशी गाण्याची शैली निर्माण केली. शास्त्रीय संगीतापुरती मर्यादित न राहता सुगम संगीत आणि लोकसंगीतालाही त्यांनी आपलेसे केले. पाश्र्वगायनातही आपला ठसा उमटवला. त्यांची ही सांगीतिक कारकीर्द कशी घडत गेली, हे त्यांच्याचकडून जाणून घेता येणार आहे.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे मिनी थिएटरमध्ये दुपारी साडेतीन वाजता व्हिवा लाऊंजच्या व्यासपीठावर संगीतमय गप्पांची ही अनोखी मैफल रंगणार आहे.
सर्वासाठी हा कार्यक्रम खुला असल्याने गाण्याविषयी, रागाविषयी तुमच्या मनातील साऱ्या शंका आरती अंकलीकर यांना थेट विचारण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
व्हिवाची वाटचाल
लोकसत्ताच्या व्हिवा लाऊंज उपक्रमात यापूर्वी सोनाली बेंद्रे, अंजली वेदपाठक, सुप्रिया सुळे, बेला शेंडे, डॉ. रश्मी करंदीकर, आरजे मलिष्का, उर्मी जुवेकर, गौरी शिंदे, स्नेहा खालवलकर आदी यशस्वी महिला सहभागी झाल्या आहेत.