अभ्युदयनगरवासीयांना दिलासा; सर्वात मोठय़ा पुनर्विकासाला सुरुवात

मुंबईतील सर्वात मोठय़ा समूह पुनर्विकासाचा मान ज्याच्याकडे जातो त्या अभ्युदयनगर या ३३ एकरवर पसरलेल्या वसाहतीच्या पुनर्विकासाला अखेर सुरुवात झाली आहे. अभ्युदयनगरवासीयांना आता ५८२ ऐवजी ६८४ चौरस फूट कार्पेट आकाराचे घर मिळणार आहे. हे घर कसे असेल याचा नमुनाही विकासकाने रहिवाशांसाठी सादर केला आहे.

भेंडीबाजार परिसराला पहिल्या समूह पुनर्विकासाचा मान जात असला तरी सर्वात मोठय़ा पुनर्विकासाचे श्रेय अभ्युदयनगरकडे जाते. विजय ग्रुप आणि श्रीपती ग्रुप यांच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे अभ्युदयनगरचा पुनर्विकास चर्चेचा विषय झाला होता. अशा परिस्थितीत अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाने पुढाकार घेऊन सहकार विभागाच्या मार्गदर्शक तत्त्व ७९ (अ) नुसार निविदा प्रक्रिया राबवून रुस्तमजी समूहाच्या मे. किस्टोन रिअल्टर्सची अंतिम विकासक म्हणून ६ जुलै २०१६ रोजी नियुक्ती केली. प्रतिस्पर्धी विकासक मे. ऑर्नेट ग्रुपने अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन या प्रक्रियेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांची याचिका फेटाळल्याने मे. किस्टोन रिअल्टर्सचा मार्ग मोकळा झाला आहे. आता महासंघाने पुढाकार घेऊन ही प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला किस्टोन रिएल्टर्सने तत्कालीन विकास नियमावलीनुसार ५३२ चौरस फूट आणि स्वत:च्या नफ्यातून ५० चौरस फूट असे एकूण ५८२ चौरस फूट कारपेट क्षेत्र देण्याचे मान्य केले होते. सुधारित नियमावलीनुसार किस्टोन रिएल्टर्सने ६३४ चौरस फूट आणि नफ्यातून ५० चौरस फूट अशा पद्धतीने ६८४ चौरस फूट कारपेट क्षेत्र देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार नमुना घरही तयार करण्यात आले आहे. आपले स्वप्नातील घर कसे असेल हे रहिवाशांना पाहायला मिळणार आहे, असे महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार काटकर यांनी सांगितले. मे. किस्टोन रिएल्टर्सला सर्वाधिक गृहनिर्माण संस्थांनी अनुकूलता दाखविली. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या गृहनिर्माण संस्था विरोधात आहेत; परंतु निविदा मसुद्यातील अटीनुसार ज्या विकासकाला सर्वाधिक गृहनिर्माण संस्थांची पसंती मिळेल तो अंतिम विकासक असेल आणि तो सर्वावर बंधनकारक असेल, असे नमूद आहे. त्यानुसारच किस्टोन रिएल्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे; परंतु सर्वाचा एकत्रित पुनर्विकास हे आमचे ध्येय आहे. सर्व रहिवाशांना समान सुविधा देण्यात येतील, असेही काटकर यांनी सांगितले.

अभ्युदयनगरवासीयांनी आपल्या समूहावर जो विश्वास दाखविला आहे तो सार्थ ठरविण्यासाठी वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. दर्जेदार आणि सुविधांनी युक्त असे घर देतानाच देखभालीसाठी आवश्यक कॉर्पस निधीही आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. रहिवाशांच्या स्वप्नातील हे घर असेल, असा आमचा दावा आहे.

– चंद्रेश मेहता, संचालक, रुस्तमजी समूह