शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आपली त्यांच्यावर किती निष्ठा होती हे दाखविण्याची एकच लाट शिवसैनिकांमध्ये उसळली होती. त्याच भरात महापालिकेच्या स्थायी समितीचे अतिउत्साही अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी शिवाजी पार्कचे नामांतर ‘शिवतीर्थ’ करावे, असा प्रस्ताव मांडला होता. गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेसाठी नामांतराचा प्रस्ताव आला त्यावेळी तो मांडणारे दस्तुरखुद्द शेवाळेच गैरहजर राहिल्याने हा प्रस्ताव आता पूर्णपणे बारगळला आहे.
स्व. बाळासाहेब शिवाजीपार्कचा उल्लेख नेहमी ’शिवतीर्थ’ करीत असत. त्यामुळे या मैदानाचे नामकरण ‘शिवतीर्थ’ करावे, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली होती. मात्र तिला सर्वच थरातून मोठा विरोध झाला होता. त्यामुळे मग मैदानाला नको, किमान स्मृती चौथऱ्याला तरी शिवतीर्थ नाव द्या, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. या साऱ्या पाश्र्वभूमीवर स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत हा प्रस्तावर चर्चेसाठी आला. मात्र त्या चर्चेला स्वत: शेवाळेच गैरहजर राहिले.
प्रस्ताव मांडणारा नगरसेवक त्यावरील चर्चेसाठी उपस्थित नसल्यास तो प्रस्ताव रद्द होतो. राहुल शेवाळे यांना हा नियम माहीत असूनही ते गैरहजर राहिले. त्यामुळेच या प्रस्तावाच्या चर्चेला गैरहजर राहण्याची नामुष्की शेवाळे यांनी पत्करावी लागल्याचेही बोलले जात आहे.