मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेवरही पुलांच्या उंचीची अडचण

मुंबईकरांच्या गारेगार प्रवासाचे स्वप्न पूर्ण करणारी वातानुकूलित लोकल गाडी अजून किमान चार ते पाच महिने प्रवाशांच्या सेवेत येणार नसली, तरी या गाडीला मुंबई शहराच्या हद्दीत प्रवेश मिळणे कठीणच असल्याचे दिसत आहे. मध्य रेल्वेवर अनेक ठिकाणी उंचीमुळे ही गाडी कुल्र्याच्या पुढे येणार नसल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले आहे. पण आता पश्चिम रेल्वेवरही चर्चगेट ते माहीम यांदरम्यान १० ते ११ ठिकाणी उंची कमी असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही गाडी पश्चिम रेल्वेवर चाललीच, तर वांद्रे ते विरार या पट्टय़ातच चालवावी लागणार आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कुर्ला येथे दाखल झालेली वातानुकूलित गाडी अजूनही कारशेडमध्ये चाचणीसाठी तयार झालेली नाही. दिवाळीपासून या गाडीच्या चाचण्या कारशेडमध्ये सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्याच वेळी मध्य रेल्वेवर टिळक पूल, शीव येथील स्थानक पूल आणि दादरपुढील सर्वच जुने पूल व रेल्वे रूळ यांच्यातील अंतर या गाडीसाठी खूप कमी असल्याने ही गाडी कुल्र्यापुढे येणार नसल्याचेही सांगण्यात येत होते. त्यामुळे या गाडीच्या चाचण्या पश्चिम रेल्वेवर घेण्याचाही विचार चालू होता. मात्र याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्डाकडूनच होणार आहे.

मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेनेही या गाडीच्या चाचणीसाठीचे आपले नियोजन तयार करण्यास सुरुवात केली आहे. या गाडीची उंची सध्याच्या बंबार्डिअर किंवा सिमेन्स कंपनीच्या गाडय़ांपेभा ५० ते ७५ मिमीने जास्त आहे. त्यामुळे या गाडीला माहीम, टिळक पूल, लोअर परळ या ठिकाणी आणि चर्चगेट ते महालक्ष्मी यांदरम्यान आणखी आठ ते नऊ ठिकाणी समस्येचा सामना करावा लागणार आहे. या ११ ते १२ ठिकाणांपैकी सहा ते सात ठिकाणी ओव्हरहेड वायर वर करून किंवा रेल्वे रूळ थोडेसे खाली घेऊन तेथून गाडी चालवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण माहीम, दादर आणि लोअर परळ येथे हे काम करणे शक्य नाही, असे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ही गाडी पश्चिम रेल्वेवर चालवण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिल्यास ती वांद्रे-विरार या टप्प्यातच चालवली जाईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

उंचीची समस्या कुठे?

मरिन ड्राइव्ह स्थानक पूल, केनेडी पूल, फ्रेंच पूल, गिरगाव स्थानकाजवळील पादचारी पूल, ग्रँट रोड स्थानकाजवळील पूल, मुंबई सेंट्रल स्थानक पूल, महालक्ष्मी स्थानक पूल, लोअर परळ स्थानक पूल, टिळक पूल आणि माहीमजवळील पूल.