बांधणी खर्चात वाढ; आराखडा व बांधणीतील दिरंगाईचा फटका? 

तब्बल साडेतेराशेहून अधिक किलोमीटरचे अंतर कापून मुंबईकरांची पहिलीवहिली वातानुकूलित उपनगरी गाडी अखेर मंगळवारी मध्य रेल्वेवर दाखल झाली. यामुळे येत्या काळात मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार असला, तरी प्रशासनाला मात्र या उपक्रमाने ‘घाम’ फोडला आहे. लोकलचा आराखडा आणि बांधणीतील विलंबामुळे वातानुकूलित लोकलचा खर्च तब्बल २३ टक्क्यांनी वाढल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगितले जात आहे.

रेल्वे मंत्रालयाने मार्च २०१४ साली वातानुकूलित लोकलचा आरखडा मंजूर केला होता. या वेळी या गाडीचा अपेक्षित खर्च ४३ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. मात्र दोन वर्षांनंतर हाच खर्च सुमारे ५४ कोटींवर पोहोचला असल्याचे सूत्रांनी सांगितले. वातानुकूलित लोकलच्या बांधणीत उशीर झाल्याने हा खर्च वाढल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी स्वयंचलित दार असलेल्या लोकलचा आणि वातानुकूलित लोकल गाडीच्या बांधणीसाठी लागणारा अपेक्षित खर्च रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. त्यानुसार वातानुकूलित लोकलचा खर्च ४३ कोटी इतका अपेक्षित होता.

वातानुकूलित लोकलचा संपूर्ण खर्च अद्याप आमच्याकडे आलेला नाही. तसेच ही पहिली वातानुकूलित लोकल आहे. त्यामुळे खर्चाची तुलना करणे योग्य ठरणार नाही.

– के. एन. बाबू, चेन्नईच्या इंटिग्रल कोच कारखान्यातील अधिकारी आणि महाव्यवस्थापकांचे सचिव