येत्या ऑक्टोबर महिन्यापासून वातानुकूलित रेल्वे मुंबईकरांच्या सेवेत रूजू होणार असल्याचे संकेत शनिवारी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले. तसेच मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याच्यादृष्टीने जोरदार हालचाली सुरू असून, जपानी अधिकाऱ्यांमार्फत या प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील चाचपणी सध्या सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्यामुळे मुंबईकरांना ऑक्टोबर महिन्यात बऱ्याच काळापासून प्रतिक्षा असलेल्या वातानुकूलित रेल्वेने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
यंदाच्या वर्षात मुंबईत वातानुकूलित रेल्वे सुरू करण्याची घोषणा प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पाच्यावेळी केली होती. सुरूवातीला ही सेवा पश्चिम रेल्वेवर धावणार असल्याचेही निश्चित झाले होते. तसेच यापूर्वी या गाडीचे सुटे भाग आणि डबे मार्च २०१५पर्यंत पश्चिम रेल्वेकडे येतील असे सांगण्यात आले होते. या लोकलची जोडणी झाल्यानंतर विविध ठिकाणी, विविध परिस्थितीत तिच्या चाचण्या घेतल्या जातील. या चाचण्यांचा अहवाल रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे जाईल. रेल्वे सुरक्षा आयुक्तही या लोकलची सुरक्षा चाचणी घेतील. त्यानंतर या गाडीला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यावरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी स्पष्ट केले होते.