उंचीच्या समस्येमुळे गाडी जाण्यात अडचण

‘मेक इन इंडिया’ अभियानाअंतर्गत चेन्नईच्या इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरीमध्ये तयार झालेली पूर्ण भारतीय बनावटीची वातानुकुलित लोकल गाडी मुंबईत आल्यापासून कुर्ला कारशेडमध्ये पडून आहे. आता या गाडीच्या चाचण्यांची सुरुवात होणार असली, तरी प्रत्यक्ष रेल्वेमार्गावर होणाऱ्या या चाचण्या पश्चिम रेल्वेवर करायच्या की मध्य रेल्वेवर, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. मध्य रेल्वेवर माटुंग्यापुढे ही गाडी जाण्यात उंचीचा अडसर असल्याचे ‘मरे’च्या अधिकाऱ्यांनी याआधीच रेल्वे बोर्डाला कळवले आहे. आता पश्चिम रेल्वेवरही दादरपुढे ही गाडी येण्यास उंचीचाच अडथळा ठरत असल्याचे समोर येत आहे. परिणामी या गाडीमुळे दोन्ही रेल्वेचे अधिकारी ‘घामाघुम’ झाले आहेत.

बीएचईएल कंपनीची विद्युत प्रणाली असलेली ही गाडी ५ एप्रिल रोजी मुंबईत दाखल झाली होती. त्यानंतर या गाडीचा इंडक्टर हा महत्त्वाचा भाग येण्यास विलंब लागल्याने ही गाडी कुर्ला कारशेडमध्येच पडून होती. आता हा भाग आला असून येत्या आठवडय़ात या गाडीच्या जागच्या जागी होणाऱ्या चाचण्या सुरू होणार आहेत. पण रेल्वेमार्गावर चाचण्या घेण्यात गाडीच्या उंचीची मोठी अडचण येणार आहे.

रेल्वेच्या नियमावलीप्रमाणे मुंबई उपनगरीय क्षेत्रात डीसी-एसी परिवर्तन झाल्यापासून लोकल गाडय़ांची रूळांपासून ते ओव्हरहेड वायपर्यंतची उंची ४२६५ मिमी एवढीच असणे आवश्यक आहे. या वातानुकुलित लोकलच्या प्रत्येक डब्यावर वातानुकुलन यंत्रे बसवल्याने या गाडीची उंची ४३२५ मिमी एवढी आहे. मध्य रेल्वेवर दादर येथील टिळक पुलासह त्यापुढील अनेक पुलांची उंची खूपच कमी असल्याने ओव्हरहेड वायर व पुलाचा पृष्ठभाग यांच्यातील अंतर आधीच धोकादायक आहे. त्यात गाडीची उंची जास्त झाल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या गाडीच्या चाचण्या सीएसटी-कल्याण या क्षेत्रात होणे अशक्य असल्याचे रेल्वे बोर्डाला कळवले आहे.

आता पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मते पश्चिम रेल्वेवरील काही पुलांची उंचीही खूप कमी असल्याने ही गाडी पश्चिम रेल्वेवर चालण्यातही अडचणी येणार आहेत. रेल्वे या गाडीची उंची विविध तांत्रिक बदल करून ४२९० मिमी एवढय़ापर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तेवढे पुरेसे नसल्याचे हे अधिकारी स्पष्ट करतात. त्यामुळे वातानुकुलित गाडी चाचणीसाठी तयार झाली, तरी तिची चाचणी कुठे घेणार, हा रेल्वे प्रशासनासमोरील मोठा प्रश्न आहे.

बिघाडांच्या धास्तीमुळे गाडीची टोलवाटोलवी?

या गाडीत वापरलेली बीएचईएल (भेल) कंपनीची विद्युतप्रणाली उपनगरीय क्षेत्रात चालणाऱ्या काही जुन्या गाडय़ांमध्ये वापरण्यात आली होती. या प्रणालीत वारंवार बिघाड होत असल्याचा मध्य व पश्चिम रेल्वेचा जुना अनुभव आहे. हीच प्रणाली वातानुकुलित गाडीतही असल्याने ही गाडी मध्येच बंद पडण्याची धास्ती दोन्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. ही गाडी बंद पडल्यास ती इंजिन लावून खेचून कारशेडमध्ये नेण्याशिवाय गत्यंतर नाही. त्या काळात उपनगरीय गाडय़ांप्रमाणेच लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वाहतूकही खंडित होईल. हा धोका घेण्यासाठी दोन्ही रेल्वे तयार नसल्याचे दोन्ही रेल्वेमधील काही अधिकारी गोपनीयतेच्या अटीवर सांगत आहेत.