राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांच्या मालमत्तेवर छापे घालण्याचे सत्र बुधवारीही सुरू होते. दुपारी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वांद्रे येथील भुजबळ कुटुंबीय विश्वस्त असलेल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेवर छापे घातले. या छाप्यात आक्षेपार्ह अशी कुठलीही कागदपत्रे सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
छगन भुजबळ यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह १७ जणांवर महाराष्ट्र सदन घोटाळा तसेच कलिना येथील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या निर्मितीमधील अनियमिततेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. उच्च न्यायालयाने याबाबत उघड चौकशीचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई सुरू झाली होती. मागील आठवडय़ात या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाव छापे घालण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी भुजबळ कुटुंबियांच्या मुंबईसह पुणे, ठाणे, नाशिक आदी ठिकाणच्या १७ विविध निवासस्थाने, कार्यालयांवर छापे घालण्यात आले होते. या छाप्यांमध्ये महागडय़ा मुर्त्यां आणि चित्रांशिवाय काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांन रिकाम्या हाताने परतावे लागले होते. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. बुधवारी पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने वांद्रे येथील भुजबळ विश्वस्त असलेल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेवर छापा घालून तपासणी केली. मात्र या कारवाईतही पोलिसांना काहीच आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने स्पष्ट केले. आज, गुरुवारी याबाबतचा सद्यस्थिती अहवाल (स्टेटस रिपोर्ट) लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग उच्च न्यायालयात सादर करणार आहे.

भुजबळ समर्थकांचा नाशिकमध्ये रास्ता रोको
नाशिक : छगन भुजबळ आणि कुटुंबियांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करत भुजबळ समर्थकांनी बुधवारी येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. यावेळी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. काही बसगाडय़ांवर दगडफेकही झाली. हे आंदोलन राष्ट्रवादीने केल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात येत असला तरी आंदोलकांमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांपेक्षा भुजबळ यांच्या समता परिषदेचे कार्यकर्ते अधिक प्रमाणावर होते.

‘लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालमत्तेची आकडेवारी फुगविली’
मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडीनंतर आपल्या मालमत्तेबद्दलची आकडेवारी फुगवून प्रसिद्धीस दिल्याचा आरोप  छगन भुजबळ यांनी केला आहे.
वरळीतील ‘सुखदा’ या वास्तव्य असलेल्या इमारतीतील सदनिकेचे क्षेत्रफळ ७५६ चौरस फूट आहे. तरीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन हजार चौरस फूट क्षेत्रफळ असल्याची माहिती प्रसिद्धीस दिली. या इमारतीत नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांच्याही सदनिका आहेत, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.  चर्चगेट येथील माणेक महल येथील सदनिका पणजीने मृत्युपत्राद्वारे पंकज याच्या नावे केली. त्याचे क्षेत्रफळ ८०० चौरस फूट असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२०० चौरस फूट असल्याची माहिती प्रसिद्धीस दिली आहे. माझगाव येथील सदनिका ३० वर्षांपूर्वी खरेदी केली आहे. नाशिकमध्ये २५ वर्षांपूर्वी फार्म हाऊस बांधले. त्यानंतर त्यात टप्प्याटप्प्याने वाढीव बांधकाम केले. या मालमत्तेची किंमत १० कोटी होऊ शकते, पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १०० कोटींची मालमत्ता असा उल्लेख केला आहे. सर्व मालमत्तांच्या किमती वाढल्या आणि त्यानुसार प्राप्तिकर भरत असल्याचा दावा भुजबळ यांनी केला.

भुजबळांनी तेलमाफियांना पाठीशी घातले
माजी पोलीस अधिकाऱ्याचा आरोप
मुंबई : छगन भुजबळ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाची कारवाई सुरू असताना संजीव कोकीळ या माजी पोलीस अधिकाऱ्याने भुजबळांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. भुजबळ गृहमंत्री असताना त्यांचे तेल माफिया आणि अंडरवर्ल्डशी संबंध होते आणि भुजबळांनी त्यांच्याविरोधात कारवाई करू दिली नाही, असा सनसनाटी आरोप कोकीळ यांनी बुधवारी केला.
संजीव कोकीळ हे २००९ मध्ये माता रमाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात मी मुसाफीर खाना येथील अंडरवर्ल्ड आणि तेल माफियांविरोधात कारवाई केली होती. ही कारवाई रोखण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी माझ्यावर दबाव आणला होता, असा आरोप कोकीळ यांनी केला. मी त्यांच्या दबाबावा बळी पडलो नाही, त्यामुळे त्यांनी एका महिलेच्या माध्यमातून मला अडकविण्याचा प्रयत्न केला होता, असाही आरोपही त्यांनी केला. याविरोधात त्यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त संजीव दयाळ आणि अरुप पटनायक यांच्याकडे भुजबळांविरोधात लेखी तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यावरही काहीच कारवाई झाली नसल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी पुरावे देऊन न्यायालयातही लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.