मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर वाकसई गावाजवळ भरधाव टेम्पोने ट्रेलरला मागून धडक दिल्याने अपघात झाला. यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे. सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या असल्याचे समजते. ही घटना शुक्रवारी (दि. २८) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो (एमएच १७ एजी ६६१२) पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव जात होता. वाकसई गावाजवळ आल्यानंतर टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून जात असलेल्या ट्रेलरला (एमएच ४६ एएफ ३५३५) मागून धडक दिली. यामध्ये टेम्पो चालक केबिनमध्ये अडकला होता. त्याला एमएसआरडीसीचे आर्यन देवदूत पथक व आयआरबी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढले. अपघातग्रस्त वाहनांना सकाळी आठच्या सुमारास रस्त्यावरून हटवण्यात आले. वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे. टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे.