वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या एका अपघातात दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला. कुर्ला स्थानक पश्चिम ते वांद्रे स्थानक पूर्व यादरम्यान धावणाऱ्या ३१० क्रमांकाच्या बसची धडक एका दुचाकीला लागली. दुपारी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बसचालकाला अटक केल्याचे समजते.
कुर्ला स्थानकावरून वांद्रे स्थानक पूर्व येथे जाणाऱ्या ३१० क्रमांकाच्या बसने बीकेसी भागातील सिटीबँक थांब्याजवळ एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील टीना मोटवानी (२२) आणि संध्या गुप्ता (२५) या दोघी गंभीर जखमी झाल्या. त्या दोघींना तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान, बसचालक नामदेव दामसे (४५) याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र बीकेसी पोलिसांनी त्याला वांद्रे-कुर्ला संकुल येथून अटक केली.