मुलाच्या दहावीतील यशाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या एका कुटुंबाच्या टॅक्सीला भरधाव वेगाने येणाऱ्या ऑडीने घडक दिली. या भीषण अपघातात टॅक्सीचालकासह या मुलाचे वडील ठार झाले तर चार जण जखमी झाले. पूर्व मुक्त मार्गावर सोमवारी रात्री हा अपघात घडला. जान्हवी गडकर ही वकील महिला मद्यप्राशन करून ही ऑडी गाडी चालवत होती. या अपघातात ती बचावली असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.
नळबाजार येथे राहणाऱ्या साबूवाला कुटुंबातील चौघे जण सोमवारी रात्री भिवंडी येथील एका धाब्यावर जेवणासाठी गेले होते. नौउमर साबूवाला (१६) याला दहावीत चांगले गुण मिळाल्याने ते हा आनंद साजरा करण्यासाठी भिवंडीला गेले होते. पूर्व मुक्त मार्गावरून ते सीएसटीच्या दिशेने येत होते. त्याच वेळी मध्यरात्री दीडच्या सुमारास समोरून चुकीच्या मार्गिकेतून भरधाव वेगाने लाल रंगाची ऑडी गाडी येत होती. ती चुकीच्या दिशेने येत असल्याचे पाहून टॅक्सीचालक मोहम्मद हुसेन यांनी वेग कमी करीत गाडी बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ऑडीने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या टॅक्सीचालक मोहम्मद हुसेन आणि सलीम साबूवाला (५०) यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर हाफिजा साबूवाला (४५), साबिया साबूवाला (२२), सलमा साबूवाला (२०) यांच्यावर सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाफिजा आणि नौऊमर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे आरसीएफ पोलिसांनी सांगितले.
ऑडी गाडी जान्हवी गडकर (३२) ही महिला वकील चालवत होती. आपल्या मित्रासमेवत ती एका पंचतारांकित हॉटेलातून मद्यपान करून चेंबूर येथील घरी परतत होती. मात्र तिने प्रचंड मद्यपान केल्याने तिचे गाडीवर नियंत्रण नव्हते. ऑडी गाडीतील एअर बॅगमुळे तिला खरचटलेही नाही. तिला सदोष मनुष्यवधाच्या गुन्हय़ाखाली अटक करण्यात आली असून तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी सांगितले. ती एका बडय़ा कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करते. टॅक्सीचालक नागपाडा येथे राहत असून त्याला दोन मुली आहेत.