मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी पहाटे कार उलटून भीषण अपघात झाला. यामध्ये गाडीतील पाचजणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सध्या निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्याजवळ पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याठिकाणी आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. ही गाडी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. या गाडीतून एकुण सहाजण प्रवास करत होते. यापैकी पाचजण जागीच ठार झाले. उर्वरित एकावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. कामशेत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास MH 14 EU 7038 क्रमांकाची मारुती सुझुकी सियाज कार कामशेत हद्दीत भरधाव वेगात जात होती. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाल्याने भीषण अपघात झाला.
अपघातात मृत पावलेले सर्व जण पुण्यातील बावधन येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे. मयत व जखमी साधारण २५ ते २८ वयोगटातील आहेत.  मृतांमध्ये आदित्य भांडारकर, यश शिरली या दोघांची ओळख पटली असून ते पुण्यातल्या बावधनचे आहेत. धायरीच्या सिंहगड कॉलेजचे हे सर्व विद्यार्थी असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. कामशेतचे पोलीस निरीक्षक आय.एस. पाटील पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच बांधकाम व्यवसायिक आणि उद्योगपती डी.एस.कुलकर्णी यांच्या कारला मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर भीषण अपघात झाला. अपघातात कुलकर्णी यांचा चालक नीरज सिंग जागीच ठार झाला होता तर कुलकर्णी जखमी झाले होते. पर्यावरणवाद्यांचा आग्रह आणि न्यायालयाच्या तत्कालीन निर्णयामुळेच पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातात दिवसेंदिवस बळींची संख्या वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
VIDEO: सरकारच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे अपघात- डी.एस.कुलकर्णी