मान्सूनबाबत वेधशाळेच्या अंदाजाच्या अगदी उलट अंदाज नोंदवणाऱ्या स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने जुलैमध्येही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मेडन ज्युलिअन ऑक्सिलेशन (एमजेओ) प्रभावी नसल्याने जुलैमध्ये मान्सूनचा जोर कमी राहील, असे वेधशाळेकडून जाहीर झालेले असतानाच १५ जुलैनंतर एमजेओ पुन्हा कार्यरत होणार असून जुलैमध्ये सरासरीपेक्षा चार टक्के पाऊस जास्त होईल, असा अंदाज स्कायमेटने दिला आहे. मात्र जुलैमध्ये मराठवाडा, उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मात्र कोरडय़ा दिवसांचा काळ लांबणार आहे, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
स्कायमेटच्या अंदाजाप्रमाणे  जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून अलनिनो असतानाही मान्सूनने गेल्या दशकातील सर्वात चांगली सुरुवात केली. जुलै १५ पर्यंत राजस्थानपर्यंत पोहोचणाऱ्या मान्सूनने २६ जून रोजीच संपूर्ण देश काबीज केला, अशी माहिती देत स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन सिंग यांनी जुलैबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
जुलैमधील पावसाची सुरुवात काहीशी संथ असून दोन ते सहा जुलैदरम्यान दिवस कोरडे राहतील. मात्र त्यानंतर ६ ते ८ जुलै, १४ ते १७ जुलै आणि २३ ते २६ जुलैदरम्यान चांगला पाऊस पडेल. याशिवाय ३० जुलै ते २ ऑगस्टमध्येही मान्सूनचा पुढील टप्पा आहे. ६ ते ८ जुलैदरम्यान मुख्यत्वे उत्तर, मध्य व पूर्व भारतात पाऊस पडेल. मेडन जुलिअन ऑक्सिलेशनमुळे जूनमधील पावसाला मदत केली होती. जुलैच्या दुसऱ्या पंधरवडय़ात वातावरणातील ही प्रणाली पुन्हा कार्यरत होईल व भारतातील पाऊस वाढेल. अल निनो स्ट्राँग झाला आहे. मात्र गेल्या वर्षांपासून त्याच्या प्रभावात चढ उतार होत आहेत. यापूर्वी लागोपाठ दुष्काळ पडलेल्या १९८६ व ८७ या वर्षांत तो कायम प्रभावी होता. त्यामुळे यावेळी त्याचा प्रभाव जाणवणार नाही.
अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या पृष्ठभागावरील तापमान सध्या एकसमान आहे. मात्र ऑगस्टमध्ये अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान काहीसे वाढण्याची शक्यता आहे, त्याचा मान्सूनला फायदा होईल. एप्रिलमध्ये वर्तवलेल्या १०२ टक्के मान्सूनच्या अंदाज आम्ही आजही मांडतो आहोत तसेच जुलै व ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा २० टक्के पाऊस कमी झाल्यासच यावेळी दुष्काळ म्हणता येईल व आता त्याची शक्यता कमी दिसते आहे, असेही स्कायमेटचा अंदाज सांगतो.