मुंब्रा भागात मंगळवारी रात्री राकेश संजय रॉय (३०) या तरूणावर त्याचा मित्र पोबीर याने अ‍ॅसिड फेकल्याची घटना उघडकीस आली असून जखमी झालेल्या राकेशला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोबीर पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुंब्रा येथील रेल्वे स्थानक परिसरात राकेश राहत असून पोबीरही त्यांच्यासोबत राहत होता. मंगळवारी मुंबईहून राकेश दारूच्या नशेत घरी परतला. तेथे त्याचे पुन्हा  पोबीरसोबत मद्यपान सुरू झाले.  
त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली आणि पोबीरने त्यांच्यावर अ‍ॅसीड फेकले. मात्र, त्यांचे भांडण नेमके कोणत्या कारणावरून झाले, याविषयी अद्याप उलगडा झाला नाही. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.