शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा पाळण्यात आलेल्या बंदबद्दल ‘फेसबूक’वर प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल दोन तरुणींनी अटक करण्याची कारवाई ठाणे ग्रामीण पोलिसांना भोवणार असून, कोकण विभागीय महानिरीक्षकांच्या अहवालानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात उद्या कारवाई केली जाणार आहे.
कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुखबिरसिंग यांनी सरकारला सादर केलेल्या अहवालात ठाणे ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा ठपका ठेवला आहे. ठाणे ग्रामीणचे अधीक्षक रवींद्र सेनगांवकर, अतिरिक्त अधीक्षक निशाणदार व पालघरचे निरीक्षक पिंगळे यांच्यावर कृतीबद्दल ठपका ठेवण्यात आला आहे. शिवसैनिकांच्या दबावाला बळी पडून ठाणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केल्याबद्दल देशभर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. पोलिसांच्या कारवाईबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व कारवाईचे संकेत दिले.
‘फेसबूक’प्रकरणी कोणती कारवाई करावी याबद्दल मुख्यमंत्री चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यात चर्चा झाली. २६/११च्या दिवशीच पोलिसांवर कारवाई केल्यास चुकीचा संदेश जाईल, असा युक्तिवाद पाटील यांनी केली. परिणामी उद्या कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. निलंबनाची कारवाई करण्याऐवजी बदलीची शिक्षा द्यावी, अशी गृह विभागाची भूमिका असली तरी कठोर कारवाई झाली पाहिजे यावर मुख्यमंत्र्यांचा भर आहे.