पालिकेच्या सेवेत असताना अनधिकृत बांधकामाला आशीर्वाद देणाऱ्या एका उपप्रमुख अभियंत्यावर निवृत्तीनंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. या अभियंत्याच्या निवृत्ती वेतनातून एक हजार रुपये दंड म्हणून वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पालिकेच्या एम-पश्चिम विभाग कार्यालयात विजय पाटील उपप्रमुख अभियंता पदावर कार्यरत होते. त्यावेळी जेसिंटो हाऊसमधील अनधिकृत बांधकामाबाबत सुमीर सबरवाल यांनी तक्रार केली होती. मात्र विजय पाटील यांनी संबंधित अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते.
दरम्यान, विजय पाटील ३१ जानेवारी २०१२ रोजी सेवानिवृत्त झाले. खात्यांतर्गत करण्यात आलेल्या र्सवकष चौकशीत विजय पाटील दोषी आढळल्याने त्यांना शिक्षा म्हणून मूळ निवृत्ती वेतनातून एक हजार रुपये दंड म्हणून वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका सभागृहाच्या १६ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. सभागृहाची मंजुरी मिळताच ही रक्कम तात्काळ वसूल करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.