डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असलेल्या औषधांची ऑनलाइन विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने स्नॅपडीलवर कारवाई केली. या औषधांचे साठे तपासण्यासाठी स्नॅपडीलच्या गोरेगाव येथील गोदामावर छापा टाकण्यात आला, तसेच संकेतस्थळावर लिहिलेली औषधांची नावे तातडीने काढून टाकण्यास बजावण्यात आले.
वस्तूंची ऑनलाइन विक्री करणाऱ्या स्नॅपडील डॉट कॉम या संकेतस्थळावर अ‍ॅस्कोरील कफ सिरप आणि वायग्रा टॅबलेट ही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असलेली औषधे मिळत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. ही माहिती योग्य असल्याची खात्री संकेतस्थळावरील याद्या व विक्रीमधून करण्यात आली. त्यानंतर गोरेगाव येथील स्नॅपडीलच्या गोदामावर छापा टाकण्यात आला, तसेच संकेतस्थळावरील औषधांची विक्री, वितरण व संकेतस्थळावरील माहिती याबाबत सर्व माहिती देण्याचे स्नॅपडीलला फर्मावण्यात आले. त्याचप्रमाणे या औषधांची विक्री करण्यात गुंतलेली दुकाने, व्यक्ती, कंपन्या, त्यांच्यातील करार, शुल्काच्या पावती आदींची माहितीही मागवण्यात आली. स्नॅपडीलच्या संकेतस्थळावरून प्रिस्क्रिप्शन आवश्यक असलेल्या औषधांची नावे तातडीने काढण्यास सांगितले गेले. स्नॅपडीलच्या मुंबई कार्यालयाने दिल्ली येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून ही नावे काढून टाकत असल्याचे स्पष्ट केले.
औषध व सौंदर्यप्रसाधन कायदा, १९४० नुसार प्रिस्क्रिप्शन असल्यावरच परवानाधारक दुकानदाराला ही औषधे विकता येतात. या ऑनलाइन विक्रीत या दोन्ही अटी पाळण्यात आल्या नाहीत. स्वतच्या मर्जीने औषधे खरेदी करणे रुग्णासाठीही धोकादायक ठरू शकते. स्नॅपडीलसारखी कंपनी डॉक्टर किंवा फार्मसिस्ट म्हणून काम करू शकत नाही, त्यामुळेच त्यांची कार्यालये व गोदाम तपासण्याचे आदेश दिले, असे एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. स्नॅपडीलप्रमाणेच फ्लिपकार्ट व अ‍ॅमेझॉन या ऑनलाइन विक्री होत असलेल्या संकेतस्थळांच्या चौकशीचेही आदेश देण्यात आल्याचे ते म्हणाले.
स्नॅपडील ही कंपनी विक्रेते व ग्राहक यांना जोडणारे माध्यम आहे. अशा प्रकारची उत्पादने लक्षात आल्यास तातडीने संकेतस्थळावरून काढून विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई केली जाते. या प्रकरणात एफडीएकडून नोटीस मिळाल्यावर लगेचच ही औषधे संकेतस्थळावरून काढली गेली आहेत, असे स्पष्टीकरण स्नॅपडीलकडून देण्यात आले. यापूर्वीही मोबाइलऐवजी साबण पाठवल्याप्रकरणी स्नॅपडील गोत्यात आले होते.