आयुर्वेद अभ्यासक्रमातून पुत्रप्राप्ति, चातुवण्र्याचा प्रचार

राज्यातील आयुर्वेद महाविद्यालयांतून शिकविल्या जाणाऱ्या बीएएमएसच्या अभ्यासक्रमांमधून पुत्रप्राप्तिचे उपाय सुचवून व चातुर्वण्र्याचा प्रचार करुन गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा तसेच भारतीय राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाचा भंग केला जात असून, त्याबद्दल आरोग्य विज्ञान विद्यापीठावर कारवाई होणार असे संकेत मिळाले आहेत. आयुर्वेद अभ्यासक्रमातून हा अक्षेपार्ह मजकूर वगळावा, अशा सूचना विद्यापीठाला दिल्या जातील, अशी माहिती कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.

मुलीच्या जन्माला कमी लेखत कोणत्याही स्वरुपात पुत्रप्राप्तिचा उपाय सुचविणे आणि त्याचा प्रसार करणे हा गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याने (पीसीपीएनडीटी) गुन्हा ठरविला आहे. तरीही बीएएमएमसच्या अभ्यासक्रमातून केवळ पुत्रप्राप्तिचाच नव्हे तर, त्यासाठी ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र स्त्रीने कोणते विधी करावते, याचाही उल्लख आहे व ते विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. या संदर्भात बीएएमएसच्या अभ्यासक्रमातून हा आक्षेपार्ह मजकूर वगळावा किंवा आरोग्य विज्ञान विद्यापीठावर कायदेशीर कारवाई करावी, अशी नोटीस अंधश्रद्धा निर्मूलन समिती व प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. प्रदीप पाटील व महाराष्ट्र सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कुटुंब कल्याण विभागाला दिली होती. त्याची गंभीर दखल घेऊन या विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. आर्चना पाटील यांनी या संघटनांना उत्तरादाखल पाठविलेल्या पत्रांमध्ये, आरोग्य विज्ञान विद्यापीठावर कार्यवाही करण्याबाबत विचार सुरु आहे, असे म्हटले आहे.