भुजबळांचे समर्थन की शरद पवारांचा अन्य काही उद्देश?
राष्ट्रवादीच्या राजकारणात छगन भुजबळ हे नेहमीच लक्ष्य झाले आहेत. याच भुजबळांच्या विरोधात कारवाईचा फास आवळला जाताच पक्षाध्यक्ष शरद पवार हे रिंगणात उतरले आणि राजकीय हेतूने कारवाई केला जात असल्याचा हल्ला त्यांनी भाजपवर चढविला. भुजबळांवरील ‘प्रेमा’पेक्षा राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांच्या विरोधात कारवाई होऊ नये म्हणून दबाव वाढविण्याकरिताच पवारांनी हा संदेश दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
समीर भुजबळ यांना अटक झाल्याने छगन भुजबळ हे पुढील लक्ष्य असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विविध नेत्यांवरील आरोपांमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा आधीच खराब झाली आहे. नेतेमंडळींना अटक झाल्यास त्याचा पक्षाला फटका बसू शकतो हे ओळखूनच स्वत: पवार रिंगणात उतरले. भुजबळांच्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. एकाच प्रकरणी तीनदा धाडी पडण्याचा प्रकार पहिल्यांदाच बघायला मिळाला. हे सारे राजकीय हेतूने प्रेरित वाटते, असेही पवार यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत सूडभावनेने कारवाई केली गेली नव्हती. अगदी १९९५ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तेत आलेल्या युती सरकारने कधी अशी कारवाई केली नव्हती. तेव्हा मनोहर जोशी आणि नारायण राणे मुख्यमंत्री होते, पण त्यांनीही कधी सूडभावनेने विरोधकांच्या विरोधात कारवाई केली नव्हती. या सरकारबद्दल काही समजत नाही, असे सांगत पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले. भुजबळ यांच्यावर जे आरोप झाले आहेत ते निर्णय त्यांनी वैयक्तिक घेतले नव्हते, तर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतले होते याकडे पवार यांनी लक्ष वेधले. सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन करीत चौकशीला सामोरे जावे, असा सल्लाच पवार यांनी भुजबळ यांना दिला.

पवारांचा रोख कोणावर ?
भुजबळांचे पवार यांनी समर्थन केले असले तरी अजित पवार किंवा तटकरे यांच्या विरोधात त्या पद्धतीने कारवाई होऊ नये, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने पवार यांनी सत्ताधारी भाजपवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. समीर भुजबळ यांच्यावर कारवाई झाली असतानाच जलसंपदा खात्यातील घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात आहे, असे सांगत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कुरघोडी केली.

सुडाचे राजकारण नाही – एकनाथ खडसे</strong>
 मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात सुरू असलेली कारवाई राजकीय आकसाने केली जात असल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आरोपांचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी खंडन केले असून राज्य सरकार सुडाचे राजकारण करीत नसल्याचे स्पष्ट केले. कारवाईबाबत त्यांचे आक्षेप असतील तर ते न्यायालयात जाऊ शकतात, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या आर्थिक गुन्हे विभाग किंवा केंद्र सरकारच्या यंत्रणांकडे पुरावे असल्याने ही कारवाई होत आहे. त्याच्याशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. कारवाईस कोणाचा आक्षेप असेल किंवा ती चुकीची आहे असे वाटत असेल तर संबंधित मंडळी न्यायालयात जाऊ शकतात, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.