नियमांच्या चौकटीवर मात करीत मुंबई पोलिसांची कामगिरी

अमली पदार्थ विक्रेत्यांवर तसेच उत्पादकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया अतिशय वेळखाऊ व कडक नियमांची चौकट असलेली आहे. परंतु, मुंबई पोलिसांनी या अडथळय़ांवर मात करीत गेल्या २२ वर्षांत प्रथमच एमडी उत्पादन करणारे कारखाने उद्ध्वस्त केले. त्यामुळे एमडी उत्पादकांमध्ये जबर दहशत निर्माण झाली आहे.

अमली पदार्थाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याची झाडाझडती घेण्याचे अधिकार केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक(एनसीबी), महसूल गुप्तचर संचालनालयाकडे(डीआरआय) आहेत. या यंत्रणा हव्या त्या वेळी कारखान्यांची तपासणी करू शकतात. मुंबई पोलिसांना ते अधिकार नाहीत. आरोपी अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून माहिती पुढे आल्यास न्यायालयाची परवानगी घेऊन, स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करून मुंबई पोलिसांना कारखान्यात शोध मोहीम राबवावी लागते. अनेकदा हे नियम चौकटीत बसवून कारखान्यात धाड घालणे शक्य होत नाही. या अडथळय़ांवर मात करीत मे महिन्यात अमली पदार्थविरोधी पथकाने कुरकुम एमआयडीसीतील सुजलाम केमिकल्स कंपनी उद्ध्वस्त केली.

या कंपनीला एकूण आठ रसायनांच्या निर्मितीची परवानगी होती. ही व एमडीसाठी आवश्यक असलेली रसायने भिन्न होती. परवाना असलेली रसायने तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल (रसायने) विकत घेता येतात. त्यामुळे मालक हरिश्चंद्र दोरगे एमडीसाठी लागणारी रसायने अवैध पद्धतीने एका बडय़ा व्यावसायिकाकडून विकत घेत होता. ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार हा बडा व्यावसायिक राज्यातील चोरटय़ा एमडी उत्पादक कंपन्यांशीही संलग्न होता, असे चौकशीत समोर आले आहे. मात्र, पथक त्याच्यापर्यंत पोहचण्याआधीच त्याने देशाबाहेर पलायन केले.

दोरगेचा कारखाना उद्ध्वस्त करून पथक थांबलेले नाही. तर त्याच्या मालमत्तेची चौकशीही पथकाने सुरू केली. आजवर न घडलेली कारवाई पथकाकडून सुरू झाल्याने चोरीछुपे एमडीचे उत्पादन घेणाऱ्या अन्य कंपन्या दहशतीत आहेत.

उत्पादक आणि वितरण साखळीवर प्रभावी मारा केल्यामुळे गेल्या महिन्याभरात एमडीचे उत्पादन, पुरवठा पूर्णपणे रोखण्यात यश आले आहे. मात्र या यशाने हुरळून न जाता अमली पदार्थ उत्पादकांवर करडी नजर ठेवून धडक कारवाया सुरूच ठेवल्या जातील.

शिवदीप लांडे, पोलीस उपायुक्त, अमली पदार्थविरोधी पथक