‘एमडी’चा पुरवठा थांबल्याने तस्करांकडून ‘गिऱ्हाईकां’ची फसवणूक; पाच रुपयांच्या भुकटीची सात हजारांत विक्री

राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये ‘एमडी’ या अमली पदार्थाचे चोरटे उत्पादन घेणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या वितरकांवर मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाईचा धडाका लावल्याने मुंबईतील व्यसनाधीन तरुणांना होणारा ‘एमडी’चा पुरवठा थांबला आहे. मात्र, याचा गैरफायदा घेऊन ‘एमडी’च्या नावाखाली नशेबाजांना ट्रायपोलिडीन, क्रोसिन, पॅरासिटामॉल या औषधी गोळय़ांची पूड किंवा अजिनोमोटो विकून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. औषध दुकानांमध्ये अगदी पाच रुपयांना मिळणाऱ्या गोळय़ांची भुकटी करून ती ‘एमडी’च्या नावाने सात हजार रुपये प्रति ग्रॅम दराने विकली जात असल्याची माहिती उजेडात आली आहे.

सध्या मुंबई, ठाणे परिसरातील नशेबाजांच्या हाती ‘एमडी’च्या ऐवजी चक्क अजिनोमोटो किंवा औषधी गोळय़ांची भुकटी ठेवण्यात येत आहे. गेल्या दीडेक महिन्यांमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवायांत जप्त करण्यात आलेले ‘एमडी’ प्रत्यक्षात औषधी गोळय़ांची भुकटी असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले.

अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या सहा महिन्यांमध्ये अशक्य अशी कारवाई करून दाखवीत कर्नाटकच्या हुगळी आणि पुण्यातील एमडी उत्पादन करणारे कारखाने उद्ध्वस्त केले. एकाच वेळी उत्पादन आणि वितरकांच्या साखळीवर प्रखर मारा केल्याने राज्यात पथकाचा दरारा निर्माण झाला. एमडीचे उत्पादन आणि पुरवठा कमी झाल्याने तरुणांमधील व्यसनाधीनता कमी होण्याची आशा निर्माण झाली असताना हे प्रकरण समोर आले आहे.

वेगळय़ा ढंगाने उत्पादन?

  • आवश्यक असलेल्या रसायनांचे प्रमाण, त्यांचे मिश्रण व मिश्रणाची प्रक्रिया माहीत असलेला कोणीही दहा बाय दहाच्या जागेत रिअ‍ॅक्टर(साध्या भाषेत कुकर) सहजरीत्या एमडी तयार करू शकतो.
  • एक किलो एमडी तयार करायला साधारणत: ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. मात्र एमडी तयार झाल्यानंतर त्याची विक्री २० ते ३० लाख रुपयांना होते. त्यामुळे एमडी उत्पादक व वितरकांना आठवडय़ाला शंभर ते दीडशे पटींत फायदा मिळतो.
  • कोकेनपेक्षाही एमडीला जास्त मागणी, एका झटक्यात होणारा फायदा लक्षात घेऊन राज्यातल्या कानाकोपऱ्यात वसलेल्या औद्योगिक संकुलांमधील रासायनिक विभागातील कंपन्या चोरीछुपे एमडीचे उत्पादन करीत होत्या. मात्र, अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या काही दिवसांत कडक कारवाई मोहीम राबवून यावर नियंत्रण आणले आहे.
  • परंतु, अमली पदार्थविरोधी पथकातील अनुभवी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थाची निर्मिती, वितरण आणि त्याची नशा कधीच पूर्णपणे बंद होणार नाही.
  • एमडी उत्पादन बंद झाले असले तरी उत्पादक, ड्रग माफिया एमडीसारखा दुसरा रासायनिक अमली पदार्थ बाजारात आणू शकतात. चाचणीत एमडीच्या संज्ञेत बसणार नाही, असे नवे रसायनांचे मिश्रण बाजारात येऊ शकते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.